सौरभ राव यांच्या आदेशांना डावलत “ऑनलाइन’ शक्कल
पुणे – महापालिकेचे कोणतेही काम करण्यासाठी पोलिसांच्या “ना हरकत प्रमाणपत्राची’ गरजच नाही, असे लेखी आदेश सौरभ राव यांनी आयुक्तपदाचा पदभार सोडताना दिले होते. मात्र, यावर कडी करत पोलिसांनी मात्र “परवानगी आवश्यकच’ असा फतवा काढला आहे. एवढेच नव्हे, तर केवळ महापालिका नव्हे तर महामेट्रो, केबल कंपन्यांसह जे कोणी खोदाई करतात, त्या सर्वांसाठी हे आदेश लागू असल्याचे या फतव्यात म्हटले आहे. परवानग्यांबाबत सर्वसामान्यांना त्रास होऊ नये यासाठी “ना हरकत प्रमाणपत्र’ घेणे ऑनलाइन करण्यात आल्याचे वाहतूक पोलिसांतर्फे कळवण्यात आले आहे. मात्र, या सोयीच्या आडून त्यांनी सर्व कामांना परवानगी आवश्यक असल्याचेही अप्रत्यक्षरित्या सांगितले आहे.
संस्था आणि नागरिकांनी ना-हरकत पत्रासाठी ऑनलाइन पद्धतीचा वापर केल्यामुळे त्यांना वाहतूक शाखेच्या मुख्यालयामध्ये येण्याची आवश्यकता नाही. यासह ही प्रक्रिया पारदर्शी झाल्याने नागरिकांच्या वेळेची बचत होणार आहे, असे वाहतूक पोलिसांच्या पत्रात म्हटले आहे.
मात्र, महापालिकेच्या कामांसाठी “ना हरकत प्रमाणपत्रा’ची आवश्यकता नाही. हे प्रमाणपत्र न घेता महापालिकेने विकास कामे सुरू केल्यास, पोलीस त्यावर हरकत घेऊ शकतात, असेच या पत्रातून वाहतूक पोलिसांनी सांगितले नाही ना, अशी शंका निर्माण झाली आहे.
असा करा अर्ज…
ज्या नागरिक आणि संस्थांना रस्त्यांवर विकासकामे करण्यासाठी वाहतूक शाखेकडील ना-हरकत पत्राची आवश्यकता आहे. त्यांनी संकेतस्थळावर मराठी किंवा इंग्रजी भाषेत “ऑनलाइन’ अर्ज करावा. संकेतस्थळावर ऑनलाइन परवाना मिळण्याची आणि अर्जाची सध्यस्थिती जाणून घेण्याची पद्धत नमूद केली आहे. याबाबत काही अडचण असल्यास वाहतूक शाखेतील नियोजन विभागाच्या ई-मेलवर पाठवावे, अशी माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली आहे.