पळसदेव, (वार्ताहर) – खडकवासला कालव्याच्या लाभक्षेत्रातील सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी उजनीतून पाणी उपसा योजना राबविण्याची गरज आहे. शेटफळगढे येथे कालव्यात पाणी सोडून ते सिंचनासाठी उपलब्ध करून देता येईल.
या योजनेच्या मंजूरीसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार दत्तात्रेय भरणे यांनी केले.
भादलवाडी (ता. इंदापूर) येथील ब्रिटीशकालीन तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे आज आमदार दत्तात्रेय भरणे यांच्याहस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास प्रताप पाटील, अॅड. प्रदीप जगताप, प्रवीण कन्हेकर, दत्तात्रेय कन्हेरकर, नाथसाहेब कुताळ, अजित जगताप,
विकास आढाव, बाळासाहेब भांडवलकर, लालासाहेब हगारे, बापुसाहेब भंडलकर, नंदकुमार पानसरे, खडकवासला पाटबंधारे विभागाचे उपअभियंता श्यामराव भोसले यांसह शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते. खडकवासला कालव्याचे पाणी फुरसुंगी बोगद्यातून काढण्यास मंजुरी मिळाली आहे.
मुळशीचे पाणी टेलच्या इंदापूरकरांना देण्याबाबत सुर्वे समितीचा अहवाल आला आहे; मात्र उजनीतून पाणी उचलून शेटफळगढे येथे कालव्यात सोडल्याशिवाय पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मिटणारा नाही. निरा-भीमा स्थिरिकरण योजनेतून भादलवाडी तलावात पाणी सोडण्याबाबत प्रयत्न करणार असून, यातून तलावावर अवलंबून असलेल्या गावांतील शेतकर्यांचा पाणी प्रश्न सोडण्याचे प्रयत्न करणार आहोत.
कामे केली, मतदान रुपी आशिर्वाद द्या……
निवडणूकीपुरतं येऊन गोड बोलायचं, पाव्हणा-रावळा गाठून वेगळा प्रचार करायचा असं कधी मी केलं नाही. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली आहेत. यापुढेही राहिलेली कामे करण्यास प्राधान्य असेल.
मी कधीही जातीपातीचं आणि पाहुण्याला राजकारण करत नाही. केवळ सार्वजनिक हिताची कामे केली आहेत. यावर तुमचा विश्वास असल्यास येणार्या विधानसभा निवडणुकीत मला मतदानरुपी आशिर्वाद देण्याचे आवाहन आमदार भरणे यांनी केले.