गरज ‘एमबीबीएस’ची, भरती ‘बीडीएस’ डॉक्टरांची

‘एमबीबीएस' मिळत नसल्याने जिल्हा परिषदेने केली ‘बीडीएस'ची भरती

पुणे – करोना संसर्ग वाढत असताना, दुसऱ्या बाजूला बाधितांना उपचारांसाठी डॉक्टरांची वानवा आहे. जिल्हा परिषदेने तीन ते चारवेळा जाहिरात देऊनदेखील डॉक्टरांकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे वेळेत निदान होत नसल्याने प्रादुर्भाव वाढत आहे. त्यावर एमबीबीएस पात्रतेचे डॉक्टर मिळत नसल्याने बीडीएस डॉक्टरांची भरती जिल्हा परिषदेने केली आहे. तर, मेडिकल शाखेतील पदव्युत्तर विद्यार्थ्यांना करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी परवानगी द्यावी, असा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाने राज्य वैद्यकीय शिक्षण विभाग संचालकांकडे पाठवला आहे. मात्र यावर निर्णय झालेला नाही.

 

ग्रामीण भागात तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार मिळत नसल्याने रुग्णांना शहर गाठावे लागत आहे. त्याठिकाणी जाऊन बेड मिळतील याची शाश्वती नाही. त्यामुळे बेडसाठी रुग्ण आणि नातेवाईकांची फरफट होत आहे. त्यात पैसा आणि वेळ खर्च होत आहे. कोविडसाठी कंत्राटी स्वरूपात भरती करण्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने निर्णय घेतला. त्यानुसार प्रशासकीय पातळीवर हालचाली होऊन पदांची निश्चितीींझाली. पहिल्यांदा जाहिरात दिल्यानंतर वैद्यकीय अधिकारी पदासाठी दोन ते तीन डॉक्टरांनी प्रतिसाद दिला. परंतु, तेदेखील नंतर रूजू झाले नाही.

 

सध्या डॉक्टरांसह इतर 715 पदे अद्याप रिक्त आहेत. आयुष वैद्यकीय अधिकारी पदासाठी 304 पदे मंजूर आहेत, त्यापैकी 41 उमेदवार उपलब्ध झाले आहेत. वैद्यकीय अधिकारी पदासाठी बीडीएसची 75 पदे भरली. आरोग्यसेविकेची 472 पदे होती त्यापैकी 417, वार्डबॉयसाठी 190 पैकी 153, ईसीजीसाठी 37 पैकी केवळ 5, क्ष किरण तज्ज्ञ पदासाठी 24 पैकी 22 आणि हॉस्पिटल मॅनेजर- 29 पैकी केवळ 6 पदांना प्रतिसाद मिळाला आहे.

 

वैद्यकीय पदव्युतर विद्यार्थ्यांना करोना उपचारांची परवानगी द्या

मेडिकल शाखेतील पदव्युतर विद्यार्थ्यांना करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी परवानगी द्यावी, असा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाने राज्य वैद्यकीय शिक्षण विभाग संचालकांकडे पाठवला आहे. मात्र यावर निर्णय झालेला नाही. प्रस्तावास मान्यता मिळाली, तर पुणे जिल्ह्यात सुमारे 600 डॉक्टर उपलब्ध होऊ शकतात. तसेच जम्बो हॉस्पिटल इतर खासगी हॉस्पिटलमध्येही बेडची संख्या वाढवता येऊ शकते. शहरासह ग्रामीण भागात करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे कोविड केअर सेंटरची संख्या वाढवली आहे तसेच खासगी रुग्णालयांमध्ये बेड्स संख्या वाढवण्यात आली आहे. मात्र, या कोविड केअर सेंटर, जम्बो हॉस्पिटलसाठी डॉक्टर मिळेनासे झाले आहे. यामुळे डॉक्टर तसेच पॅरामेडिकल स्टाफ घेण्यासाठी कसरत सुरू आहे.

 

ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वीच जिल्हा परिषदेने आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी कंत्राटी स्वरूरपात वैद्यकीय अधिकारी व इतर आवश्यक कर्मचारी भरती करण्याचे ठरवले होते. त्यातील अनेक पदांना प्रतिसाद मिळाला, तर वैद्यकीय अधिकारी पदासाठी डॉक्टर कमी प्रमाणात उपलब्ध झाले आहेत. सध्या एकूण मंजूर 1 हजार 774 पैकी 1 हजार 59 पदे भरली आहेत.

– निर्मला पानसरे, अध्यक्ष, जि.प.पुणे

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.