पूर्व हवेलीत अनेक गावांत उड्डाणपुलाची गरज

वाहतूक कोंडीमुळे त्रस्त नागरिकांची मागणी : स्थानिक नेत्यांच्या विरोधामुळे मनस्तापाची वेळ

सोरतापवाडी – पुणे- सोलापूर महामार्गावरील सततच्या वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून अनेक गावांत उड्डाणपुलांची मागणी पूर्व हवेलीतील नागरिकांनी केली आहे.

सोलापूर महामार्गावर कवडीपाट ते कासुर्डीपर्यंत 27 किलोमीटरचा चौपदरी रस्ता 2003 ला आयआरबी कंपनीला “बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर देण्यात आला. यावेळी त्यांनी पुढील वाढत्या वाहतुकीचा प्रश्‍न विचारात घेऊन दोन-तीन ठिकाणी उड्डाणपुलाचे नियोजन केले होते; पण स्थानिक गावपातळीवर त्या पुलाचे नियोजन बारगळले. गावपुढाऱ्यांच्या जमिनी रस्त्यालगत असल्याने पुलामुळे आपल्या जमिनींना किंमत राहणार नसल्यामुळे पुलाचे नियोजन त्यांच्या रेट्यामुळे रद्द करण्यात आले; परंतु आता त्याचा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागत आहे.

कवडीपाट टोलनाका ते उरुळीकांचनपर्यंत वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. महामार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असून अपघात वाढले आहेत. रुग्णवाहिकेला मार्ग मिळत नसल्याने रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. कदमवाकवस्ती येथे हिंदुस्थान पेट्रोलियम डेपोमुळे सतत वाहतूक कोंडी होत आहे. लोणी स्टेशन येथील चौकात रस्त्याच्या कडेला लावलेल्या गाड्यांमुळे वाहतूक कोंडी, राजबाग कॉर्नर येथील सर्व बाजूच्या वर्दळीमुळे वाहतूक कोंडी होते. राजबाग येथील रस्त्याच्या खालील पुलाचा उपयोग होत नाही.

उरुळी काचंन येथील चौकात स्थानिक लोक रस्त्यावर गाडी लावून बिनधास्त फिरत असतात. दुकाने व बॅंकेचे पार्किंग नसल्याने गाड्या रस्त्यावर लावल्या जातात. तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे यांनी उरुळीकांचन येथील वाहतुकीचा प्रश्‍न सोडवला होता. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक चेतन थोरबोले यांनी गाडीवाल्यांना सरळ केले होते; पण आता वाहतुकीचा खेळखंडोबा झाला आहे. तळवाडी चौकात चारही बाजूंनी स्वतःचे वाहन पुढे नेण्यासाठी स्पर्धाच सुरू असते. महात्मा गांधी रोडवरून कॉलेजचे विद्यार्थी बुलेटच्या फायरिंगचा आवाज काढून गाडीवाल्यांचे लक्ष विचलित करीत आहेत. याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता त्यांनी पोलीसांची संख्या कमी असल्याचे सांगून सर्वत्र वाहतूक पोलीस ठेवता येणार नसल्याचे सांगण्यात आले.

तीन ठिकाणी उड्डाणपुलांची गरज
कदमवाकवस्ती ते लोणी स्टेशनपर्यंत एक उड्डाण पूल, थेऊर फाटा ते कुंजीरवाडी नायगाव फाट्यापर्यंत दुसरा उड्डाणपूल व उरुळी काचंन येथे प्रयागधाम फाटा, एलाईट चौक ते तळवाडी चौकांपर्यंत पुलाची आवश्‍यकता आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.