लोणी काळभोर, (वार्ताहर) – येथील पेट्रोलियम कंपन्यांच्या टर्मिनलमधून बाहेर पडणा-या टँकरमधून मास्टर की वापरून किंवा इतर मार्गाने पेट्रोल – डीझेल चोरणारे माफिया गेली कित्येक वर्षे सक्रिय असूनही पोलीस खाते, पुरवठा विभाग किंवा संबंधित पेट्रोलियम कंपन्या या शासकीय यंत्रणांना गेल्या 35-40 वर्षांत या पेट्रोल माफियांवर अंकुश ठेवायला अजिबातच जमले नाही.
कदमवाकवस्ती ग्रामपंचायतींच्या हद्दीत असलेल्या पेट्रोलियम कंपन्यांच्या दहा किलोमीटर व्यासाच्या अंतरात छोटे मोठे पेट्रोल माफियांचे अड्डे आहेत.
या ठिकाणांची माहिती ठराविक टँकर चालकांना असते. टँकर भरला की हे चालक पहिल्यांदा टँकर या माफियांच्या ठिकाणी घेऊन जातात.
तेथे देण्याघेण्याचा व्यवहार पार पडतो. पाच ते दहा मिनिटात टँकर तेथून बाहेर पडतो. गेल्या काही वर्षांपासून टँकरला जीपीएस सिस्टीम बसवण्यात येत आहे. त्यामुळे सर्व टँकर माफियांचे अड्डे महामार्गाच्या शेजारी आहेत.
तरीही पोलिसांना पुरवठा विभागाला किंवा शासनाच्या कुठल्याही विभागाला हे अड्डे सापडत नाहीत किंवा सापडले तरीही काही कारणांमुळे ठोस कायदेशीर कारवाई होत नाही.
राजरोसपणे महामार्गालगत पेट्रोलजन्य पदार्थ बनावट चाव्यांचा वापर करून दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणांत काढले जात असल्याची माहिती मिळते
परंतु येथून अवघ्या दिड किलोमीटर अंतरावर असलेल्या पोलीस ठाण्यास किंवा पेट्रोलियम कंपनीतील टर्मिनलच्या अथवा 20 किलोमीटर अंतरावरील पुणे शहरातील पुरवठा विभागाच्या अधिका-यांना कशी मिळत नाही? की माहिती मिळूनही ते या बाबीकडे मुद्दामच कानाडोळा करतात अशी चर्चा या परिसरात सुरू आहे.
टर्मिनलमधून माल भरून कुलूप लावलेनंतर बाहेर पडलेल्या टँकरची एक चावी कंपनीकडे टर्मिनलमध्ये तर दुसरी पंपमालकाकडे असते मग चोरट्यांकडे चाव्या कोठून येतात? असा सवाल उपस्थित होत आहे. यामुळे या प्रकरणात कुंपणच शेत खात नाही ना? असा प्रश्न ही या निमित्ताने विचारला जात आहे.
फक्त पोलीस खात्याकडूनच कारवाई
गेल्या महिन्यात पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाली लोणी काळभोर पोलिसांनी या पेट्रोल माफियांवर कारवाई केली आहे. अशा प्रकारच्या कारवाया अधूनमधून होणे गरजेचे आहे. पेट्रोलियम कंपन्या, पुरवठा विभाग यांनी ही अशा प्रकारच्या कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
पेट्रोल माफियांवर फक्त पोलीस खात्यानेच कारवाई करण्याऐवजी संबंधित सर्व शासकीय विभागांनी समन्वय साधून ठराविक कालावधीत कारवाई केली पाहिजे, तरच हे अवैध धंदे बंद होतील, अशी चर्चा लोणी काळभोर परिसरात सुरू आहे.
समन्वय व सातत्य नसल्याने फावले
यापूर्वी ही पुणे ग्रामीण पोलिसांच्या व नंतर पुणे शहर पोलीसांच्या वेगवेगळ्या पथकांनी पेट्रोल माफियांवर कारवाई केली आहे; परंतु या कारवायांमध्ये सातत्य नसते. त्यामुळे आज कारवाई झाली तरी दुस-या दिवशी नव्या जोमाने, नव्या उत्साहात परत पेट्रोल चोरीचे धंदे सुरू होतात.
त्यामुळे या कारवायांबाबतीत विविध शासकीय खात्यांमध्ये समन्वय व सातत्य असणे आवश्यक आहे.
समन्वय व सातत्य नसल्याने पेट्रोल माफियांचे फावले आहे. पेट्रोल काढताना टँकरला आग लागण्याच्या घटना घडल्या तरीही धंदे मात्र मोठ्या प्रमाणात सुरुच आहेत.
मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखे कर अशा प्रकारची कारवाई करुन हे अवैध धंदे बंद होणार नाहीत हे एकदा समजून घेण्याची गरज आहे.