अमृत कण : सापडतो हरी

– अरुण गोखले

लेकराची हाक ऐकली की जशी आई ही जिथे असेल तिथून त्याच्यासाठी धावत येते, तसाच भगवंत हा सुद्धा भक्‍तांच्या भावपूर्ण हाकेला ओ देतो. त्याच्या सादेस प्रतिसाद देतो. भक्‍तापाशी धावून येतो. माझ्या प्रिय भक्‍तांना जर मला पाहायचं, भेटायचं आणि शोधायचं असेल तर मी नेमका कुठे भेटतो. याचं नेमक उत्तर देताना भगवंत सांगतात की-
परि तया पाशी पांडवा ।
मी हरपला गिरसावा ।।
जेथ नामघोषू बरवा ।
करती माझा ।।

(ज्ञानेश्‍वरी अध्याय 9, ओवी 208)
भक्‍तियोगाची महती आणि मर्म सांगणाऱ्या या अध्यायात संत ज्ञानदेवांनी या ओवीमधून तो भावाचा भुकेला भगवंत हा भक्‍त-भाविकांना नेमका कुठे सापडतो, ते मोठ्या मार्मिकपणे सांगितले आहे.

श्रीकृष्णाने सांगितले की, मी माझ्या भक्‍तांनी कितीही शोध घेतला तरी त्यांना मठ, मंदिरात किंवा तीर्थक्षेत्रात सापडत नाही. मी जपकर्त्यांना त्यांच्या जपात किंवा तपाचरण करणाऱ्या तपस्वीयांना त्यांच्या तपातही सहजासहजी भेटत नाही. मग मी भेटतो कुठे? तर जिथे जिथे माझे भक्‍त हे आर्त भावाने नामाचा गजर करीत असतात,

जिथे माझ्या नामाचे अनुसंधान चाललेले असते, जिथे नामघोष चाललेला असतो, तिथे मी त्यांना त्या नामसंकीर्तनाचे रंगी माझे देवपण विसरून नाचताना भेटतो. मी माझ्या वारकऱ्यांना त्यांच्या वारीतील नामघोषाबरोबर उचललेल्या प्रत्येक पावलागणिक भेटत असतो. मी माझ्या भक्‍तांच्या पायाखाली माझे काळीज अंथरत असतो.

देव भक्‍तास नेमका कुठे भेटतो, याचे उत्तर देणाऱ्या या ओवीमधला आणखी एक फार महत्त्वाचा शब्द म्हणजे “बरवा’. आता इथे आपल्या मनात हा प्रश्‍न येणे स्वाभाविक आहे की या बरवाचा नेमका अर्थ काय?.

कारण बरवा म्हणजे चांगला, एवढाच शाब्दिक अर्थ आपल्याला माहीत असतो; पण इथे या ओवीतल्या या बरवा या शब्दामागचा अर्थ असा आहे की बरवा म्हणजे मनापासून, चित्तापासून. जिथे भक्‍तांकडून मनापासून, चित्तापासून माझे नाम घेतले जाते तिथे मी त्यास भेटतो. मी भुकेला आहे तो त्या चित्तापासून केलेल्या भक्‍तीचा… मनापासून टाहो फोडून मारलेल्या हाकेचा, देहभान विसरून माझ्या केलेल्या नामघोषाचा. तो देव त्या नामदेवादिक संतांना वाळवंटातील कीर्तनरंगात भेटला. कारण तो हरी नेमकेपणाने सापडण्याची जागा ही तीच आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.