अमृतकण : खरी ओळख

अरुण गोखले

आपल्याला आपल्याच “स्व’ची खरी ओळख जर कोण करून देत असतील तर ते सद्‌गुरू. ते काय करतात आणि कसे जीवाच्या कोहं या प्रश्‍नाचे उत्तर त्याचे त्यालाच देतात. या संदर्भात पू. ज्ञाननाथजी रानडे यांनी एका सत्संगात सांगितलेली गोष्ट आजही लक्षात राहिलेली आहे. गोष्ट ही जरी छोटीशीच असली तरी त्यातलं मर्म हे फार मोठ आहे. ती गोष्ट अशी-

जंगलाचा राजा सिंह. एकदा काय झालं. या सिंहाचा एक छावा हा वाट चुकला आणि तो एका शेळ्या मेंढ्याच्या कळपात जाऊन मिसळला. पुढे असे झाले ही त्या भिन्न स्वभावाच्या आणि गुणधर्माच्या जीवांनाही एकमेकांचा इतका लळा लागला की, तो सिंहाचा छावा आपण सिंहाचे छावे आहोत हे विसरला आणि तो बॅ बॅ करीत त्या शेळ्या मेंढ्यांच्या बरोबर रानावनात फिरू लागला. तो आपली खरी जातकुळी, आपलं शक्‍ती सामर्थ्य, गर्जना करण्याची आपली क्षमता हे सारं विसरला आणि एक गरीब कोकरू होऊन जीवन जगू लागला.

एकदा दुसऱ्या एका सिंहाने या छाव्याला शेळ्या मेंढ्यांच्या कळपात बॅ बॅ करीत फिरताना पाहिले. त्याला त्याची दया आली. त्याने काय केले, तर संधी साधली आणि त्या छाव्याचा जाऊन कान धरला. त्यास त्याने ओढत एका तलावापाशी आणले. त्या तलावातील पाण्यात त्या सिंहाने छाव्यास त्याचे प्रतिबिंब दाखविले. त्या सिंहाच्या छाव्याने ते पाण्यातले आपलेच रुबाबदार रूप पाहिले आणि त्याला त्याची जातकुळी, त्याचा रूबाब, त्याचा इतरांवर असणारा दरारा, याचे स्मरण झाले. आपण कोण हे लक्षात येताच त्या छाव्याने गर्जना केली.

त्या आवाजाला घाबरून त्या शेळ्या-मेंढ्या दूर पळून गेल्या. त्या सिंहाच्या छाव्याला त्याचे स्वत:चे नेमके “स्व’ स्वरूप माहीत झाले. ही गोष्ट सांगून पू. ज्ञाननाथजी म्हणाले, “लोकहो! सद्‌गुरूसुद्धा हेच कार्य करीत असतात. ते आर्त मुमूक्षू जीवाला त्याच्याच “स्व’ची ओळख करून देतात. ते त्याला हे पटवून, दाखवून देतात की तू तोच आहेस. तुझ्या मी कोण? या प्रश्‍नाचं उत्तर हेच आहे की तू त्या परमात्म्याचाच एक अंश आहेस. मग इथून पुढे त्या खऱ्या अर्थाने जागलेल्या जीवाचा मी ज्याचा अंश आहे तो कोण याचा शोध घेण्याचा प्रवास चालू होतो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.