अमृतकण : काम क्रोधाचा विंचू

अरूण गोखले

मानवी मनाचं स्थैर्य, शांती जर कोण बिघडवीत असेल, तर तो म्हणजे मानवी मनास होणारा काम, क्रोधरूपी विंचवाचा, इंगळीचा दंश. काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर हे जे षडरिपू आहेत. ते नेहमीच सात्विक मानवी मनावर आपले प्रभूत्व गाजविण्याचा प्रयत्न करीत असतात. मानवी मनात कसा आणि कुठून शिरकाव करायला मिळेल, याचीच जणू ते वाटच पाहत असतात.

एकदा का यांच्यातील एका जरी रिपूने आपल्या मनावर प्राबल्य मिळवले तर आपल्या मन आरोग्याचा, त्याच्या सात्विकतेचा, शांततेचा, स्थैर्याचा नाश व्हायला वेळ लागत नाही. काही वेळा तर ते एकमेकांचा हात धरूनच चोरवाटांनी मानवी मनात प्रवेश करतात. काम आणि त्या पाठोपाठ येणारा क्रोध हे तर अगदी भयंकर घातकी आहेत. त्यांचा मनास होणारा दंभ हा आपल्या मनात मनाबरोबर आचार, विचार आणि कृतीत विष कालवतो. या काम, क्रोधरूपी इंगळीचं विष इतकं दाहक असते की ते माणसाचा सर्वनाश करताना प्रसंगी त्यास शेवटचे पाणीही मागू देत नाही.

काम म्हणजेच कोणतीही अपेक्षा. मग ती कनक, कामिनी, कीर्ती, सत्तेची कशाचीही असो. ती एकदा का मानवी मनात जागी झाली. ती अपेक्षेप्रमाणे पूर्ण झाली नाही की, माणसाचा विवेकावरचा ताबा सुटतो, आणि तो क्रोधीत होतो. क्रोधाने तो आत्मघातकी होतो. अविवेकी, अत्याचारी, अधर्मी, पापी, दुराचारी होतो आणि त्याचा सर्वनाश होतो.त्याचं मोलाचं मानवी जीवन हे मातीमोल होत.

अशा या कामक्रोधाच्या इंगळीचा दंश होऊ नये, त्याचे विष आपल्या अंगात भिनू नये म्हणून कोणता उपाय करावा हे संत एकनाथ महाराज हे आपल्या एका भारुडाच्या रचनेतून फार सुंदरपणे सांगतात. ते सांगतात- या विंचवाला उतारा। तमोगुण मागे सारा। सत्वगुण लावा अंगारा। विंचू इंगळी उतरे झरझरां।।

म्हणजे नेमके काय करा? तर काम, क्रोध हे ज्यामुळे निर्माण होतात तो तमोगुण हा मागे सारा, कमी करा. कसा? तर त्यासाठी सत्त्वगुणाची वृद्धी करा. भगवद्‌भक्‍ती, नामसाधना हे मार्ग आचरा, हा सत्त्वगुणाचा अंगारा लावला की या इंगळीचे, विंचवाचे विष उतरेल आणि तुम्ही दु:ख, क्‍लेष, यातनारहीत व्हाल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.