अमृतकण : गोड शेवट

अरुण गोखले

“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ हे अभिवचन आपल्या भक्‍तभाविकांना देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या एका पुण्यतिथीच्या कार्यक्रमात एक रचना ऐकली. ती मनाला भावली. त्या रचनेत जीवाने श्री स्वामीच्या चरणी केलेली एक मागणी होती- शेवट गोड करा गुरूराया। शेवट गोड करा। या दीनाला तव चरणाशी । द्या स्वामी आसरा। स्वामी शेवट गोड करा।।

प्रत्येकालाच असे वाटत असते की, कोणत्याही गोष्टीचा शेवट हा गोड व्हावा, हाती घेतलेले कार्य हे सिद्धीस जावे, प्रयत्नांना यशाची फुले पदरी पडावीत. सारं कसं मनासारखं अन्‌ गोड व्हावं. ही अपेक्षा मुळीच गैर अथवा चुकीची नाही. पण त्या उद्याच्या गोड शेवटासाठी त्याचा प्रारंभ, पाठपुरावा हा मात्र तेवढ्याच काळजीने करावा लागतो.

आपण आपली जीवनबाग फुलवताना इथल्या मातीची मशागत, तिला सत्कर्मांचं आणि प्रामाणिक प्रयत्नांचं खतपाणी घालून करावी लागते. त्या सुपीक मातीत चांगल्या सत्कर्माची झाडे लावावी आणि प्रयत्नपूर्वक वाढवावी लागतात. तरच आपल्या पदरी उद्या निश्‍चित चांगले फळ मिळाल्या वाचून राहणार नाही.

कारण इथे आज जे पेराल ते उद्या उगवणार, हा निसर्गाचा नियमच आहे. म्हणूनच आपल्या जीवनाचा शेवटही संकल्पपूर्तीचा, कृतार्थ जीवन सांगतेचा आणि आपण इतरांच्या स्मरणात राहू अशा सद्‌वर्तनाचा व्हावा, असं वाटत असेल तर त्यासाठी आधीपासूनच ही दक्षता घ्यावी लागते.
प्राप्त नरजन्माची सार्थकता ही साधण्यासाठी भगवंताच्या नामाची आवड धरून त्या भगवद्‌भक्‍तीच्या वाटेवर वाटचाल करीत

राहिले की आपोआपच जीवाची हीच मनोधारणा होते की “अवघाची संसार सुखाचा करीन…’ हे प्रत्येकाचं सुखाचं नेमकं ठिकाण जरी वेगवेगळं असलं, तिथे जाण्याचा वाटा जरी भिन्न असल्या तरी, नामसाधनेसारखी दुसरी साधी सोपी सरळ आणि सुलभ वाट नाही.

ही जोडणी करण्यासाठी मनात आवड असावी लागते, आवडीने सवड काढावी लागते. त्यासाठीच संतबोधाचे अमृतकण हे जीवनात वेचावे लागतात. ते जीवास लावून घ्यावे लागतात. त्यानुसार आचरण करावे लागते. आपणच आपल्या जीवनाची इतिश्री गोड करून घ्यायची असते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.