पुणे -भोर तालुक्यातील भाटघर आणि वीर धरणक्षेत्र पावसाळ्यादरम्यान पर्यटकांनी फुलून गेले असते. त्यातच नेकलेस पॉईंटवर जाण्यासाठी तर पर्यटकांच्या गाड्यांच्या रांगा लागलेल्या असतात. मात्र, यावर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळे बंद असलेल्याने हा विख्यात नेकलेस पॉईंट सुनासुना दिसत आहे, त्याचबरोबर या पर्यटनावर अवलंबून असलेल्या छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
भोर तालुक्यात विविध पर्यटनस्थळे आहेत. या ठिकाणी विशेषतः पुण्यातील पर्यटक शनिवार-रविवार आणि इतर सुटीच्या दिवशी पर्यटनासाठी भोरकडे येत असतात. पुण्याहून येताना कापूरहोळपासून भोर रस्त्याला अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर हा नेकलेस पॉईंट आहे. इंगवली बस थांब्याशेजारी हे स्थळ असून, या स्थळावरून दक्षिण दिशेला पाहिले असता अंदाजे अर्धा ते पाऊण किलोमीटर अंतरावर नीरा नदी वाहताना दिसते. या ठिकाणाहून नीरा नदीकडे पहिले असता धरणी मातेने नेकलेस परिधान केला आहे, असे हे निसर्गरूप दिसते.
या निसर्गरम्य ठिकाणी पावसाळ्यात होणारी गर्दी आणि त्या काळात इथे मिळणारा गरम चहा, भजी, मक्याची कणसे आणि याचबरोबर इतर पर्यटनाशी निगडित व्यवसायही मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात सुरू होतात. मात्र, यावर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर अजूनही पर्यटनस्थळी जाण्यास बंदी आहे. या बंदीचा परिणाम येथील व्यवसायांवरही झाला असून, या छोट्या व्यावसायिकांचा व्यवसाय बुडाला आहे.
त्यामुळे या स्थानिक लोकांवर उपासमारीची वेळ आली आहेण दर शनिवार-रविवार आणि इतर सुट्यांच्या दिवशी हा परिसर पर्यटकांनी फुलून जाते. येथे येण्यासाठी खेड-शिवापूर टोल नाक्यावरही मोठ्या प्रमाणात काही किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून येतात; पण यावर्षी टोल नाक्यांवर तुलनेने गर्दी कमी आहे.
भोरजवळील नेकलेस पॉईंट सुना सुना :
– छोट्या व्यावसायिकांवर आली उपासमारीची वेळ
– खेड शिवापूर टोल नाक्यावर वाहनांची गर्दी ओसरली
– निसर्गसौंदर्याचा आनंद घेता येत नसल्याने पर्यटकांमध्ये नाराजी
– पर्यटकांविना आज हा पॉईंट असला तरी त्याचे खरे निखळ सौंदर्य समोर येत आहे.