शिरूर ग्रामीण रुग्णालयासमोर मनसेच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन
शिरूर -शिरूर ग्रामीण रुग्णायलातील मनमानी कारभार व सतत गैरहजर असणाऱ्या प्रभारी अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी यांच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक होत आरोग्य अधीक्षक कार्यालयातील खुर्चीला हार घालून निषेध करण्याचा प्रयत्न केला.
मनसे जनहित जिल्हाध्यक्ष सुशांत कुटे, मनसे शहर अध्यक्ष संदिप कडेकर, तालुका उपाध्यक्ष रवी गुळादे, माजी शहराध्यक्ष संदिप कडेकर, उपाध्यक्ष बंडु दुधाणे, ललीत गुगळे, शैलेश जाधव, विकास साबळे, आकाश लोहार, सुनील जाधव, अथर्व आढाव, अनिकेत खोतकर, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
शिरूर ग्रामीण रुग्णालयात अनेक महिन्यांपासून येथील वैद्यकीय अधिकारी तथा प्रभारी अधीक्षक रुग्णालयात येत नसून मनमानी कारभार सुरू आहे. याबाबत अनेक वेळा वरिष्ठांना निवेदन देऊनही कुठलेही ठोस पाऊल उचलले जात नाही. केवळ आश्वासने देण्याचे काम वरिष्ठ कार्यालयाने केले आहे.
त्यामुळे आज शिरूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गळ्यामध्ये “कोणी अधीक्षक व वैद्यकीय अधिकारी देता का वैद्यकीय अधिकारी’ अशी पाटी बांधून शिरूर रुग्णालयासमोर धरणे आंदोलन धरले. ग्रामीण रुग्णालयातील अधीक्षकांच्या खुर्चीला हार घालून वेगळ्या पद्धतीने आंदोलन केले.