महापालिकेत आयुक्‍त दर्जाचा “वृक्ष व पर्यावरण’ अधिकारी आवश्‍यक

पुणे -“शहरात उपलब्ध वृक्षांची योग्य देखभाल केली जात नाही. नव्याने लागवड केल्या जाणाऱ्या वृक्षाबाबतही शास्त्रीय दृष्टिकोन राखला जात नाही. त्यामुळेच शहरातील अनेक वृक्ष व फांद्या पडून अपघात घडत असतात. हे रोखण्यासाठी महापालिकेत आयुक्‍त दर्जाचा “वृक्ष व पर्यावरण अधिकारी’ आवश्‍यक आहे. मात्र, सध्या वृक्ष प्राधिकरणामध्ये असा अधिकारी नाही. त्यामुळेच वृक्षांची योग्य देखभाल होत नाही,’ अशी खंत उद्यान सल्लागार नंदू कुलकर्णी यांनी व्यक्‍त केली.

वनराई संस्थेचे संस्थापक स्व. डॉ. मोहन धारिया यांच्या स्मृतिदिनानिमित्त रविवारी आयोजित “निसर्ग संवाद’ या पर्यावरण व्याख्यान सत्रात ते बोलत होते. या कार्यक्रमात वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, वनस्पति अभ्यासक श्री. द. महाजन, डॉ. पराग महाजन, प्रशांत इनामदार, प्रा. विनय र. र. यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कुलकर्णी यांनी वृक्ष जतन कायद्याची व नियमांची माहिती, वृक्ष प्राधिकरणाची कर्तव्ये काय आहेत, हे सांगून यंत्रणेच्या अकार्यक्षमतेवरही त्यांनी बोट ठेवले. तसेच, नैसर्गिक परिस्थितीशी जूळवून घेण्यासाठी सुयोग्य नियोजन ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्‍त केले.कार्यक्रमात स्वयंसेवकांना महाजन यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.