चेन्नई – तामिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यात ममल्पूरम येथे मासेमार समुद्रात मासे पकडण्यासाठी गेले होते. त्यांनी पाण्यात जाळे फेकल्यावर मोठा मासा गळाला लागल्याचा त्यांना भास झाला. जाळे बाहेर काढल्यावर मात्र त्यात मासा नव्हता, तर भल्याच रंगाचे पॅकेट होते. तपासणी केली असता हे अमली पदार्थ असून त्यांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत थोडीथोडकी नसून चक्क 230 कोटी रूपये असल्याचे लक्षात आले.
याबाबत माहिती देताना संबंधितांनी सांगितले की मासेमारांनी पाण्यातून जेव्हा जाळे बाहेर काढले तेव्हा त्यात हिरव्या रांगाची काही पाकिटे बाहेर आल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावर चिनी आणि इंग्रजी भाषेत काहीतरी लिहिले होते. नंतर पाकिटे किनाऱ्यावर आणण्यात आली. त्याची पाहणी केली असता ती चिनी चहाची पाकिटे असल्याचे लक्षात आले. मात्र अधिक तपासणी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
पाकिटांमध्ये मेथाफेटामाइन नावाचा अमली पदार्थ होता. तो क्रिस्टर मेथ या नावानेही ओळखला जातो. मासेमारांना एकूण 78 किलो वजनाची पाकिटे सापडली असून त्यातील अमली पदार्थाची बाजारातील किंमत तब्बल 230 कोटी रूपये आहे. हा माल श्रीलंका मार्गे मलेशियात विक्रीसाठी पाठवला जात असल्याचा कयास आहे. पुढील तपास केला जात आहे.