मुंबई : कोरोना आणि त्यामुळे लावण्यात आलेला लॉकडाऊन यामुळे लांबलेली नीट 2020 ची परीक्षा आज रविवारी पार पडत आहे. कोरोनाची पार्श्वभूमी असल्याने शिक्षण विभागाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाणार आहे. दुपारी 2 ते 5 दरम्यान ही परीक्षा होईल. यासाठी विद्यार्थ्यांना दुपारी 11 ते 1:30 दरम्यान प्रवेश दिला जाईल. देशभरातील 15 लाख विद्यार्थी ‘नीट’ मेडिकल प्रवेश परीक्षा देणार आहेत. महाराष्ट्रातील 2,28,214 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.
कोरोनाची वाढती संख्या पाहता योग्य खबरदारीचे उपाय म्हणून नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सर्व उपाययोजना करून सोशल डिस्टन्सिंग पाळलं जावं यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तीन आधीपासून सेंटर्सवर स्लॉट्सनुसार हजर राहायला सांगितलं आहे. स्लोट्समध्ये विद्यार्थ्यांना बोलवून आतमध्ये थर्मल स्क्रिनिंग, मास्क, सॅनिटायजरचा वापर करणे विद्यार्थ्यांना बंधनकारक करून या वातावरणात परीक्षा सर्व नियमांचे पालन करून घ्यावी लागत आहे.
नीट परीक्षेसाठी देशात 15.97 लाख विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे. या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची संख्या 2546 वरुन वाढवत 3843 इतकी केली आहे. तर प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांची संख्या 24 वरुन 12 करण्यात आली आहे. ही परीक्षा पुढं ढकलण्यासाठी पश्चिम बंगाल, पंजाब, महाराष्ट्र, राजस्थान, छत्तीसगड आणि झारखंड राज्यातील सहा मंत्र्यांनी याचिका दाखल केली होती मात्र सुप्रीम कोर्टाने ती याचिका फेटाळून लावली होती. प्रत्येकवर्षी ही परीक्षा मे महिन्यात पार पडते. पण लॉकडाऊनळं यंदा ही परीक्षा पुढं ढकलण्यात आली. त्यामुळे नीटची परीक्षा नेमकी घेतली जाणार का? घेतली जाणार असेलच तर ती कधी घेतली जाणार? असे प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केले जात होते. याची उत्तरं अधांतरीच होती. त्यामुळे विध्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली होती.
यावरून अनेकदा राजकारण ही रंगलं, शेवटी न्यायालयाने परीक्षा घेण्यावर शिक्कामोर्तब केला. त्यानंतर विद्यार्थ्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आणि विध्यार्थी अभ्यासाला लागले. बघता-बघता आता परीक्षा तोंडावर आली. पण आता विद्यार्थ्यांना चिंता सतावत आहे ती त्यांना परीक्षा केंद्रावर कोरोनाची लागण तर होणार नाही ना? त्यामुळेच परीक्षा केंद्रावर त्यांना नेमक्या कोणत्या सुविधा उपलब्ध असतील आणि विद्यार्थ्यांनी सोबत काय न्यायला हवं. याबाबत एका खाजगी संस्थेने विद्यार्थ्यांना आवाहन केलेलं आहे.