नगरपंचायत व पोलीस कर्मचाऱ्यांना दिले प्रशिक्षण
शिराळा (प्रतिनिधी) – शिराळा तालुक्यात वारणा व मोरणा या नद्यांना दरवर्षी मोठ्या प्रमाणात पूर येतो. मोठे नुकसान होत असते. एनडीआरएफ टीमने याबाबत संभाव्य स्थितीचा आढावा घेऊन कोकरूड पोलीस स्टेशनचे कर्मचारी व शिराळा नगरपंचायतीचे कर्मचारी यांना पूरस्थितीबाबत प्रशिक्षण दिले.
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुका हा अतिवृष्टीचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी होत असते. यामुळे बऱ्याच वेळा दुर्धर प्रसंग ओढवलेले आहेत. या तालुक्यात मोठ्या प्रमाणात धरणांची ही संख्या आहे. त्यामुळे या विभागात तसेच वारणा काठ हा परिसर नेहमी पूरर्स्थितीला तोंड देत असतो. पुरेशा प्रशिक्षणा अभावी या स्थितीला तोंड देणे शक्य होत नाही. त्यामुळेच या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रशिक्षणात एनडीआरएफ टीमने सहभाग घेतला होता. मोरणा धरण येथे हे प्रशिक्षण पार पडले. यामध्ये कोकरूड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी. बी. कदम, पोलीस कर्मचारी, तसेच शिराळा नगरपंचायतीचे कर्मचारी, पाणीपुरवठा अभियंता शरद पाटील, प्रशासकीय अधिकारी सुविधा पाटील, लक्ष्मण मलमे, मुनीर लगरदार, तात्यासो कांबळे, उपस्थित होते. दरम्यान, गत वर्षीची महाभयंकर पूरपरिस्थिती डोळ्यासमोर ठेऊन राज्य शासनाने राज्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीच्या क्षेत्रात एनडीआरएफ चे पाचारण केले आहे. त्यांची प्रशिक्षणे सुरू आहेत.