डॉ. रणदीप गुलेरिया यांचे मत
नवी दिल्ली – रशियाने विकसित केलेली करोना रोखणारी लस निर्धोक आणि परिणामकारक आहे का, लसीचे काही साइड इफेक्ट नाहीत याची खातरजमा केली पाहिजे. जर या लसीमुळे उत्तम रोगप्रतिकारकशक्ती आणि संरक्षण मिळत असेल तर भारताने ती मिळवायला हवी, असे मत ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केले आहे.
करोनावरील लस विकसित केल्याचे रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी मंगळवारी जाहीर केले. त्याबाबत जगभरातील तज्ज्ञांकडून मतमतांतरे व्यक्त करण्यात येत आहेत.
करोनाविरोधातील सक्षम रोगप्रतिकारकशक्ती या लसीमुळे मिळत आहे. माझ्या मुलीला या लसीमुळे बरे वाटत आहे, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी सांगितले. रशियाने जगातील पहिला उपग्रह स्पुटनिकवरून या लसीचे नामकरण स्पुटनिक-व्ही असे केले आहे.
अमेरिकेतील साथ नियंत्रण अधिकारी डॉ. अँटनी फौसी म्हणाले, व्यापक वापरासाठी कोणतीही लस तयार झाल्याचा कोणताही पुरावा नाही. रशियाची लस परिणामकारक आणि सुरक्षित असावी, अशा मी शुभेच्छा देतो. पण, त्यांनी अशी लस बनवली असल्याबद्दल मी साशंक आहे.