सोलापूर – महापालिकेचे माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे स्थानिक पदाधिकारी महेश विष्णूपंत कोठे (60) यांचे मंगळवारी सकाळी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले.
महेश कोठे व त्यांचे मित्र कुंभमेळ्यासाठी प्रयागराज येथे गेले होते. तिथे मंगळवारी सकाळी स्नान करीत असताना त्यांना हृदयविकाराचा धक्का आला. यात त्यांचे निधन झाल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
महेश कोठे यांच्या निधनाचे वृत्त येताच शहरावर शोककळा पसरली. त्यांच्या मुरारजी पेठेतील घरासमोर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. सोलापूर महापालिकेच्या राजकारणावर वर्चस्व असलेला नेता अशी महेश कोठे यांची ओळख होती. पद्मशाली ज्ञाती संस्थेचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. विधानसभा निवडणुकीत त्यांनी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.