युनियनची मान्यता रद्द करण्याची शिवसेनेची मागणी
नगर –महापालिका कामगार युनियन व महापालिक प्रशासन बोल्हेगाव रस्ता प्रकरणात राजकारण करीत आहे.शिवसेनेला बदनाम करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सांगण्यावरून आंदोलन करून त्यांनी शहरातील जनतेला वेठीस धरले आहे, ही कामगारांची नव्हे तर राष्ट्रवादी कॉंग्रेसची युनियन असल्याचा आरोप शिवसेनेने केला असून कामगार युनियनची मान्यता रद्द करण्याची मागणी नगरविकास खात्याकडे करण्यात आली आहे.
बोल्हेगाव रस्ता प्रकरणात शिवसेनेचे आजी आमदार अनिल राठोड यांच्यासह चार नगरसेवकांवर गुन्हा दाखल झालेला आहे. महापालिका कामगार युनियनने काम बंद आंदोलन करीत आयुक्तांना संबंधित नगरसेवकांच्या अपात्रतेबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यास भाग पाडले. या पार्श्वभूमिवर शिवसेनेने प्रशासन व युनियनवर जोरदार आरोप केले. संबंधित बोल्हेगाव फाटा रस्त्यासाठी नगरसेवक व स्थानिक नागरिक वारंवार पाठपुरावा करीत आहेत. दोन महिन्यापूर्वी या रस्ता कामाचा कार्यारंभ आदेश देऊनही ठेकेदाराने काम सुरू केले नसतांना त्याला नोटीस देणे वा काळ्या यादीमध्ये टाकण्याऐवजी या रस्त्यासाठी आंदोलन करण्यारांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यास शहर अभियंता व मनपा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे, ही शिवसेनेला बदनाम करण्याची खेळी आहे असा आरोप करण्यात आला.
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त दिलीप गावडे यांच्यावर धूरफवारणी झाली, एका विद्युत कर्मचाऱ्याला मारहाण झाली, लाईट बंद असल्याने अतिरिक्त आयुक्त व विद्युत विभाग प्रमुखाला बंद बल्बच्या माळा घातल्या गेल्या व त्यांच्यावर शाई फेकली, पण त्यावेळी प्रशासनाने गुन्हे दाखल केले नाहीत व युनियननेही नगरसेवक अपात्रता कारवाईची मागणी लावून धरली नाही, मात्र आता बोल्हेगाव रस्ता प्रकरणात युनियन व प्रशासन राजकारण करीत आहेत, असा दावा यावेळी करण्यात आला.
संबंधित ठेकेदाराला काम करण्यास कोणाकडून विरोध होतो, हे त्याने व प्रशासनाने स्पष्ट केले पाहिजे. आंदोलक रस्त्याचे काम कधी सुरु करणार हे लेखी देण्याची मागणी करीत होते. अशा स्थितीत 30 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करणे व नगरसेवक अपात्रतेची मागणी लावून धरून महापालिका बंद पाडण्यातून महापालिका प्रशासन व कामगार युनियन राजकारण करीत आहे. त्यामुळे महापालिका कामगार युनियनची मान्यता रद्द करावी अशी मागणी शिवसेनेने नगरविकास खात्याकडे केली आहे.