उपनगराध्यक्षपदी भाजपच्या किशोरी पाटील बिनविरोध
खासदार-आमदारांचा वारू रोखला
नगराध्यक्षपदाच्या निवडीत आमदार जयकुमार गोरे यांच्या सल्ल्याने नूतन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी चांगलेच लक्ष घातले होते. शहाजीराजेंसाठी त्यांनी महसूल मंत्री चंद्रकांतदादांच्या माध्यमातून चांगलीच फिल्डिंग लावली होती. मंत्र्यांच्या माध्यमातून माजी आमदार डॉ. येळगावकर यांच्यावरही दबावतंत्राचा वापर केल्याची चर्चा होती. मात्र स्थानिक परिस्थिती तसेच पुसेसावळी गटाचे नेते जितेंद्र दादा पवार व इतर काही पदाधिकाऱ्यांनी सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या माध्यमातून महसूल मंत्र्यांशी शिष्टाई करून पक्षाचे भले कशात आहे हे पटवून दिले. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने खासदार, आमदारांचा वारू रोखण्यात यश आल्याची चर्चा आहे.
सचिनशेठ हिरो… तर शिंदेंची अपुरी शर्थ
नगराध्यक्ष निवडीत दोन्ही बाजूने पूर्ण ताकदीने प्रतिष्ठा पणाला लागली होती. राष्ट्रवादीच्या वतीने “मजूर’चे संचालक सचिन माळी सर्व प्रक्रिया हाताळत होते. तर दुसऱ्या बाजूला एका अपक्षाच्या पाठीशी कॉंग्रेसचे पाठबळ घेण्याबरोबरच वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करून भाजपचाही पाठिंबा देण्याचा प्रयत्न संजय गांधी योजनेचे अध्यक्ष विजय शिंदे करीत होते. पावणेबारा वाजेपर्यंत त्यांनी शेवटपर्यंत खिंड लढविली. मात्र नशिबाने साथ न मिळाल्याने “राजें’चा “विजय” मिळविण्यात शिंदेंची शर्थ अपुरी ठरल्याची चर्चा आहे.
वडूज – वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुनील हिंदूराव गोडसे यांची बहुमताने निवड झाली. तर उपनगराध्यक्षपदी भाजपच्या सौ. किशोरी अजित पाटील यांची बिनविरोध निवड झाली. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत गोडसे यांना दहा मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष शहाजीराजे गोडसे यांना सात मतांवर समाधान मानावे लागले.
त्रिशंकू बलाबल असणाऱ्या नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद कोणाकडे जाणार याची सर्वांना उत्कंठा होती. त्यातच नगराध्यक्षपद सर्वसाधारण असल्याने मोठी स्पर्धा होती. नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे सुनील गोडसे व अपक्ष शहाजीराजे गोडसे यांचे अर्ज दाखल झाले होते. जिल्हा प्रशासन अधिकारी रवी पवार, मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या उपस्थितीत आज दुपारी बारा वाजता नगराध्यक्षपदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत सुनील गोडसे यांना दहा मते मिळाली. त्यांना राष्ट्रवादीच्या माजी नगराध्यक्षा सौ. शोभा माळी, सुनीता कुंभार, सुवर्णा चव्हाण, काजल वाघमारे, अपक्ष माजी उपनगराध्यक्ष संदीप गोडसे, विपुल गोडसे तसेच भाजपाच्या किशोरी पाटील, वचन शहा, अनिल माळी यांनी मतदान केले. तर शहाजीराजेंना कॉंग्रेसचे माजी नगराध्यक्ष डॉ. महेश गुरव, मंगल काळे, शुभांगी जाधव, छाया पाटोळे, प्रदीप खुडे, तसेच अपक्ष डॉ. सौ. नीता गोडसे यांचे समर्थन मिळाले. उपनगराध्यक्षपदी भाजपाच्यासौ. पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.
निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांची गुलालाची उधळण करीत व फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे, कोकण विभागाचे निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख, भाजपचे माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर, मजूर फेडरेशनचे संचालक सचिनशेठ माळी, भाजपचे तालुकाध्यक्ष विकल्पशेठ शहा, स्वीकृत नगरसेवक अभय देशमुख, प्रदीप शेटे, हिंदूराव गोडसे, पृथ्वीराज गोडसे आदींसह मान्यवर कार्यकर्ते सहभागी झाले होते.
“”लोकसभा निवडणूकीत आम्ही पूर्ण ताकदीने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मदत केली. त्यामुळे नगराध्यक्षपद निवडीत भाजपच्या सदस्यांनी आपणास सहकार्य करणे नैसर्गिक होते. याबाबत मुख्यमंत्री, महसूल मंत्र्यांनी सक्त आदेशही दिले होते. मात्र, स्वत:च्या स्वार्थासाठी डॉ. येंळगावकरांनी भाजपच्या नगरसेवकांना विकले.”
– शहाजीराजे गोडसे