राष्ट्रवादीचे रस्त्यावर आंदोलन  सभागृहात मात्र “मौनव्रत’

पिंपरी – महापालिकेच्या संदर्भातील तसेच शहरातील विविध प्रश्‍नांवर रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे राष्ट्रवादीचे नेते आणि नगरसेवक सभागृहात मात्र “शांत’ बसत असल्यामुळे आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. सत्ताधारी सातत्याने सर्वसाधारण सभा तहकूब करत असताना साधा निषेध नोंदविणे किंवा विरोध करण्याचे साहस देखील विरोधी पक्षाने न दाखविल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये चुकीचा संदेश गेला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील शास्तीकराच्या प्रमुख मुद्यासह रेडझोन, रिंगरोड, बफर झोन, अनधिकृत बांधकामे, साडेबारा टक्के परतावा या विषयांवर राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली गुरुवारी विविध पक्षांच्या व संघटनेच्या वतीने खंडोबा माळ ते महापालिका भवन असा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चा राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांसह बहुतांश नगरसेवकांनी सहभाग नोंदविला. शास्तीच्या नोटीसांची होळी करण्याबरोबरच बोंबाबोंब आंदोलनही करण्यात आले तर प्रखर घोषणाबाजी करत हा मोर्चा यशस्वीही केला. तर महापालिका आयुक्तांना निवेदन दिल्यानंतर महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहापर्यंत घोषणाबाजी करण्यात आली.

नगरसेवक सभागृहात जाताच त्यांनी मौनव्रत स्वीकारले. सत्ताधाऱ्यांना विरोध दर्शविण्याचे धारिष्ट्यच दाखविले नाही. 20 जुलै रोजी तहकूब करण्यात आलेली सभा 25 जुलै रोजी आयोजित करण्यात आली होती. मोर्चा संपल्यानंतर काही मिनिटांतच सभा सुरू झाली. मोर्चात उपस्थित केलेले सर्व विषय सर्वसाधारण सभेत मांडणे अपेक्षित असतानाच सत्ताधाऱ्यांनी ही सभा तहकूब केली. सत्ताधारी सभा तहकूब करत असताना याला साधा विरोधही विरोधकांना करता आला नाही किंवा निषेधही नोंदविला नाही. सभागृहाबाहेर विरोध दर्शविणारे राष्ट्रवादीचे नगरसेवक सभागृहात सत्ताधाऱ्यांना साथ देत असल्याबाबतच चर्चा शहरात रंगली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.