विधानसभेसाठी राष्ट्रवादीची जय्यत तयारी 

पुणे शहरातील सहा जागांवर दावा : दोन मतदारसंघ कॉंग्रेससाठी सोडणार

पुणे  – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पर्वती, कोथरूड, शिवाजीनगर, वडगावशेरी, हडपसर, खडकवासला या मतदार संघांवर दावा केला असून कसबा आणि कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ कॉंग्रेसला देण्यासाठीही पक्षाकडून तयारी दर्शविण्यात आली आहे. मुंबईत झालेल्या पक्षाच्या आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांनी ही मागणी केली आहे.

लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेससोबत आघाडी असली, तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बजाविलेल्या भूमिकेमुळे सहा मतदारसंघात भाजपचे मताधिक्‍य घटले आहे. त्यामुळे उपरोक्‍त सहा मतदारसंघ आघाडीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळावेत, अशी मागणी शहर पदाधिकाऱ्यांनी शनिवारी केली. यावेळी पुणे जिल्हा तसेच पिंपरी-चिंचवड शहरासाठीदेखील बैठका झाल्या.

यावेळी शहर पदाधिकाऱ्यांनी पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघाचा आढावा सादर केला. त्यात “हडपसर, खडकवासला, शिवाजीनगर, कॅन्टोन्मेंट, वडगाव शेरीसह कसबा मतदारसंघात राष्ट्रवादीने केलेल्या कामांमुळे भाजपचे मताधिक्‍य कमी झाले आहे. तसेच कॉंग्रेस उमेदवाराची मते 2014 च्या तुलनेत वाढली,’ असा दावा करण्यात आला. सन 2009 मध्ये आघाडी असल्याने दोन्ही पक्षांनी शहरातून प्रत्येकी चार जागा लढविल्या होत्या. तर 2014 मध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यानंतर महापालिका निवडणुकीतही राष्ट्रवादीचे कॉंग्रेसपेक्षा अधिक नगरसेवक आहेत. त्यामुळे 2009 चा फॉर्म्युला न ठेवता पक्षाने दोन जागा वाढवून 6 जागा लढवाव्यात, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. त्यात प्रामुख्याने हडपसर आणि खडकवासला विधानसभा असलेल्या लोकसभेच्या जागांच्या विजयाचा दाखलाही पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला.

कसबा, कॅन्टोंन्मेंट मित्रपक्षासाठी – अजित पवार

पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघात कोण-कोण इच्छूक आहेत, याची थेट विचारणा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी बैठकीतील चर्चेनंतर केली. यावेळी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात उमेदवार लढण्यास तयार असलेल्या इच्छूकांनी हात वर केले. त्यानंतर पवार यांनी स्वत: कसबा आणि कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना हे दोन्ही मतदारसंघ मित्रपक्षांना सोडावे लागणार असल्याचे स्पष्ट केले. “तुम्ही इच्छूक आहात, पक्षाचे चांगले कामही करत आहात. मात्र, या जागा सोडाव्याच लागणार असल्याने कोणीही पक्षावर नाराजी न ठेवता आहे तसेच चांगल्या पद्धतीने काम सुरू ठेवावे,’ अशा सूचनाही पवार यांनी यावेळी या दोन्ही मतदारसंघातील इच्छूकांना दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.