पी एक-दोन प्रस्तावास जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी
भिगवण – भिगवण शहरात परिसरतील 40 गावाचा संपर्क असल्याने मोठी बाजारपेठ आहे. लोकांची वर्दळ असल्यामुळे दररोजच भिगवण बाजारपेठेत मोठी वाहतूक कोंडी होत होती. ही नित्याचीच वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शहरी भागातील वाहतूक व्यवस्थेप्रमाणे सम- विषम तारखेला पी 1 आणि पी 2 प्रमाणे वाहतूक प्रणाली राबविण्यासाठी दिलेल्या प्रस्तावाला जिल्हा अधिकारी कार्यालयाकडून मंजुरी मिळाल्याची माहिती भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांनी दिली. मंजुरी मिळाल्याने वाहतूक कोंडी कमी होणार असल्याने नागरिकांची वाहतूक कोंडीतून कायमची सुटका होणार आहे.
भिगवण बाजारपेठेत वाढत असलेली रहदारी आणि अतिक्रमण आदी कारणांमुळे रस्त्यांना चिंचोळे स्वरूप आले आहे. यामुळे बाजारपेठेत व्यापारी आणि वाहनधारकांना वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागत होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला लागणाऱ्या वाहनामुळे यातून मार्ग काढताना नाकीनऊ येत होते. यातून वाद होत होते. भिगवण पोलीस चौकीचे पोलीस ठाण्यात रुपांतर झाल्यावर तत्कालीन प्रभारी पोलीस अधिकारी चंद्रशेखर यादव यांनी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी व्यापाऱ्यांच्या सहकार्याने आणि समरी पावरचा वापर करीत पी 1 पी 2 योजना राबवली होती.
मात्र, अधिकाऱ्यांची बदली होताच वाहतुकीची स्थिती पुन्हा पहिल्यासारखी झाली होती. यावर भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून आलेल्या महेश ढवान यांनी यावर कायमस्वरूपी उपाय करण्याबाबतचा प्रस्ताव तयार केला. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना हा प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने वाहनचालक आणि व्यापारी, नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
पी 1 पी 2 वाहतूक व्यवस्थेप्रमाणे मंजुरी मिळाल्याने आता नियम मोडणाऱ्यांसाठी दंडाची आकारणी करता येणार आहे. तरी पहिल्या टप्प्यात जनजागृती करणार आहे.
– जीवन माने, प्रभारी पोलीस अधिकारी, भिगवण.