पुणे –पुण्यात पुढचा महापौर हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचाच असणार आहे. अजित पवारांच्या नेतृत्वात निवडणूक जिंकू. निवडणुकीच्या तयारीला लागा, असा आदेशच खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना रविवारी दिला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मेळावा रविवारी पुण्यात घेण्यात आला. त्यावेळी सुळे यांनी भाजपवर टीका केली.|
“पुण्यातील लोक भाजपला थकले आहेत. एकदा मतदान केले, पण महापौरांकडून चांगले काम झाले नाही. येणाऱ्या निवडणुकीत महापौर राष्ट्रवादीचा होईल, असे लोक सांगत असल्याचे सुळे म्हणाल्या. अजित पवार यांच्याकडून काम करून घ्या, निवडणुकीच्या कामाला लागा, पुढचा महापौर हा राष्ट्रवादीचाच असेल. प्रचार सुरू करा,’ असा आदेश सुळे यांनी कार्यकर्त्यांना दिला.
घरगुती गॅसच्या दरात मोठी वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर सुळे यांनी आंदोलनाची घोषणा केली आहे. भाऊबीजेच्या दिवशी महिला आंदोलन करणार आहेत. सिलिंडचे दर कमी करून भाऊबीज द्या, अशी मागणी सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांच्यावर टीका करताना अशी माणसे आमच्या खिशात असतात, असे म्हटले होते. त्यावरून नवाब मलिक यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. तर, सुळे यांनीही चंद्रकांत पाटील यांना टोला लगावताना असे म्हटले आहे की, आमच्यावर यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहेत. आमच्या तोंडी अशी भाषा नसते. अशी भाषा आमच्या वाचनातही नसते.
आर्यन खानप्रकरणी भाष्य
आर्यन खानने ड्रग्स घेतले नाही; तर मग 25 दिवस आत का बसवले? आई म्हणून वाईट वाटते. शाहरुख खान हा महाराष्ट्रापुरता किंवा देशापुरता नाही तर आंतरराष्ट्रीय कलाकार आहे. त्यामुळे अशा प्रकारामुळे भारताचेही नाव खराब होते. चूक नसताना अधिकारी कारवाई करत असेल तर ते चुकीचे आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.