दौंडमध्ये राष्ट्रवादीकडून नव्या चेहऱ्याला संधी?

भाकरी फिरवणार असल्याची चर्चा : पक्षाच्या मुंबईतील बैठकीनंतर इच्छुक सरसावले

दौंड – दौंड विधानसभा मतदार संघासाठी शरद पवार उमेदवार बदलून भाकरी फिरवणार का ? अशी चर्चा सध्या तालुक्‍यात सुरू आहे. ह्या चर्चेमागचे कारण म्हणजे आगामी विधानसभेच्या तयारीसाठी इच्छुकांची चाचपणी करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांची बैठक नुकतीच मुंबई या ठिकाणी बोलावली होती. या बैठकीत दौंड तालुक्‍याचा विषय आल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी कोण कोण इच्छुक आहे? याची माहिती घेताना जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष व माजी आमदार रमेश थोरात व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष अप्पासाहेब पवार यांची नावे समोर आल्यानंतर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला अध्यक्ष वैशाली नागवडे देखील इच्छुक असल्याचे व त्यांचे नाव खुद्द राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका जबाबदार नेत्याने घेतल्याने दौंड विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारीबाबत भाकरी फिरवण्याची चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसला लोकसभेच्या निवडणुकीत आलेल्या अपयशामुळे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभेला भाकरी फिरवणार असल्याचे विधान केले होते. यानंतर लगेचच सोशल मीडियावर विधान सभेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या समर्थकांनी आत्ता भाकरी फिरणार अशा पोस्ट टाकण्यास सुरुवात केली. आता तर पक्षाच्या बैठकीत देखील इच्छुक उमेदवारांची नावे पुढे आल्याने उमेदवारीबाबत भाकरी फिरणार की थोरात यांनाच उमेदवारी मिळणार, याची चर्चा सुरू झाली आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खुद्द शरद पवारांना घरच्या मैदानावर दौंडचे आमदार राहुल कुल यांनी त्याच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी घेऊन रोखून ठेवले होते. त्यामुळे कसल्याही परिस्थितीत राहुल कुल यांना विधानसभा निवडणुकीत शह देण्यासाठी व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा झेंडा दौंड तालुक्‍यात रोवण्यासाठी खुद्द शरद पवार रणनीती आखणार असल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अपेक्षित मताधिक्‍य कांचन कुल यांना दौंडमधून मिळाले नाही त्यांना केवळ 7 हजारांचे मताधिक्‍य मिळाले. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत असले तरी त्यामुळे विधानसभा इच्छुकांची गर्दी देखील वाढली आहे.

तालुक्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला आगामी विधानसभा निवडणुकीत विजय साजरा करायचा असला, तर पक्षांतर्गत गटबाजी रोखली पाहिजे, असे मत सर्वसामान्य कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. आगामी विधानसभा निवडणूक कुल लढवणार हे निश्‍चित आहे; परंतु राष्ट्रवादीचा नेमका उमेदवार कोण हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. भाकरी फिरणार की नाही हे उमेदवारीनंतर स्पष्ट होणार असले तरी सध्या इच्छुक व त्यांचे समर्थक हे आशावादी असल्याचे पाहायला मिळत आहे.

हे चेहरे चर्चेत…
कुल यांना रमेश थोरातच निवडणुकीत शह देऊ शकतात असा दावा थोरात समर्थक करत आहेत, तर आप्पासाहेब पवार यांचे कार्यकर्ते हे नवीन चेहरा व तालुक्‍यात असणाऱ्या संपर्कामुळे तेच कुल यांना तोड देऊ शकतात असा दावा करीत आहेत. त्यातच महिला राष्ट्रवादीच्या वैशाली नागवडे या आमदार राहुल कुल यांच्या बालेकिल्ल्यात राहत असून त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत कुल यांच्या बालेकिल्ल्यात मोठी लढत दिली होती. शिवाय फडणवीस सरकारच्या विरोधात त्यांनी आक्रमक भूमिका मांडली असून, राज्यपातळीवर आक्रमक महिला नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचे तालुक्‍यासह जिल्ह्यात महिला संघटन चांगले असून त्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या अत्यंत निकटवर्तीय आहेत.

वीरधवल जगदाळे यांचे काम उजवे
विद्यमान जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व दौंड शुगर कारखान्याचे संचालक वीरधवल जगदाळे हेही विधानसभेसाठी इच्छुक आहेत. अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख असून जिल्हा परिषदेच्या व दौंड शुगर कारखान्याच्या माध्यमातून त्यांचा चांगला संपर्क आहे. दौंड नगरपालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संख्याबळ जास्त असून त्यातील बहुतांश नगरसेवक हे जगदाळे यांच्या विचारांचे आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्येक ठिकाणी प्रचारात स्वतःहून आघाडी घेत त्यांनी प्रचार केला व निवडणुकीची काही महत्त्वाची सूत्रे देखील त्यांच्याकडेच होती. त्यामुळे अजित पवार हे त्यांच्या नावालाच प्राधान्य देतील असे त्यांचे समर्थक स्पष्टपणे सांगत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)