छत्रपतींचा इतिहास हद्दपार करणाऱ्यांना हद्दपार करा

रांजणगाव येथे खासदार डॉ. कोल्हे यांचे आवाहन, दिलीप वळसे पाटील यांच्या प्रचाराची सांगता

रांजणगाव गणपती – शिवसेना-भाजप सरकारने इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास हद्दपार करण्याचा आणि गड-किल्ले भाड्याने देण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी शिवसेनेच्या ढाण्या वाघाचा नंदीबैल झाला होता का?, अशी टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी करून छत्रपतींचा इतिहास हद्दपार करणाऱ्या शिवसेना-भाजपा सरकारलाच हद्दपार करण्याचे आवाहन केले.

आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांची प्रचार सांगता सभा रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथे झाली, त्यावेळी खासदार डॉ. कोल्हे बोलत होते. याप्रसंगी महाआघाडीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, सूर्यकांत पलांडे, जनता दलाचे नाथाभाऊ शेवाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, प्रकाश पवार, सभापती विश्‍वास कोहकडे, सुनिता गावडे, ज्येष्ठ नेते सदाशिव पवार, केशर पवार, भिमाजी खेडकर, सर्जेराव खेडकर, आबासाहेब पाचुंदकर, मानसिंग पाचुंदकर, अरुणा घोडे, सविता पऱ्हाड, शेखर पाचुंदकर, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष यशवंत पाचंगे, राजू इनामदार, डॉ. वर्षा शिवले, सुभाष उमाप, रंगनाथ थोरात, राजेंद्र गावडे, बबन पोकळे, महेश ढमढेरे, प्रदीप वळसे पाटील उपस्थित होते.

खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, निवडणूक आल्यावर शिवसेना दहा, तर भाजप पाच रुपयांत थाळी देण्याचे आश्‍वासन देत आहे. परंतु, तुम्हाला द्यायचे आहे तर दहा रुपयांत शिक्षण द्या, आम्ही आमच्या हिंमतीवर शंभर रुपयांची थाळी खाऊ. आम्हाला हक्‍काचा रोजगार द्या. गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा 46 हजार कोटी रुपये खर्च करून पुतळा उभारला जातो; परंतु ज्या छत्रपतींच्या नावाने निवडणुकांमध्ये मते घेऊन सत्तेवर आलेल्या शिवसेनेला महाराष्ट्रात अरबी समुद्रात छत्रपतींच्या स्मारकाची अजून एक वीट देखील रचता आली नाही.

त्यांना मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही, असे त्यांनी नमूद केले. यावेळी जनता दलाचे नाथाभाऊ शेवाळे यांनी उमेदवार दिलीप वळसे पाटील यांना पाठिंबा दिला. तर कवठे गावचे माजी सरपंच शिवसेनेचे बबनराव पोकळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. सूत्रसंचालन निलेश पडवळ यांनी केले.

दुष्काळी शिरूर तालुका आज बागायती तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्‍याला कुकडी, डिंभे, चासकमान, आसखेड, घोड या धरणांचे पाणी मिळत आहे. ही धरणे शरद पवार यांनी बांधली. औद्योगिक वसाहती, साखर कारखाने उभारून या भागातील अर्थव्यवस्था बळकट करण्याचे काम केले.
– दिलीप वळसे पाटील, माजी अध्यक्ष, विधासभा

 

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)