बाह्यवळणाची एक लेन सुरू करा

खासदार डॉ. कोल्हे यांनी दिल्या अधिकाऱ्यांना सूचना

नारायणगाव – नारायणगाव आणि वारूळवाडी परिसरात वारंवार होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सोमवारी (दि. 28) नारायणगाव बाह्यवळणाची पाहणी करून राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या आधिकाऱ्यांना बाह्यवळणाच्या कामाला गती देऊन एक लेन सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याचबरोबर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासंदर्भात जिल्हा अधिकाऱ्यांबरोबर बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही खासदार डॉ. कोल्हे यांनी दिली .

पुणे-नाशिक महामार्गावरील दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक समस्या दूर करण्यासाठी नारायणगाव बाह्यवळण होणे अत्यंत आवश्‍यक आहे. यासाठी सोमवारी (दि. 28) दुपारी 12 वाजता नारायणगाव बाह्यवळण येथील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या मार्गी लावण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या आधिकाऱ्यांना केल्या.

यावेळी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दिलीप शिंदे, अझर शेख, नारायणगावचे सरपंच योगेश पाटे, माजी उपसरपंच जंगल कोल्हे, पोलीस पाटील सुशांत भुजबळ, सतीश काळे, विपुल फुलसुंदर, वरूण भुजबळ, संतोष निंबाळकर, गणेश वाजगे, जगन जाधव, आशिष हांडे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.