पुणे – मनपाच्या ताब्यातील सेवा क्षेत्र (ऍमेनिटी स्पेस) खासगी विकसकांना देण्याच्या प्रस्तावाला राष्ट्रवादी कॉंग्रेसने पाठिंबा द्यावा, यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. तर, पाठिंब्यावरून राष्ट्रवादीचे पदाधिकारी तसेच नगरसेवकांमध्ये दोन गट पडले आहेत. त्यामुळे याबाबतचा निर्णय घेण्यासाठी रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक बोलवली आहे.
विधानभवन येथे ही बैठक होणार आहे. त्यामुळे मनपा निवडणुकांच्या तोंडावर उच्च न्यायालयात याचिका दाखल झालेल्या या वादग्रस्त विषयावर राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजपसोबत जाणार, की प्रस्तावाला विरोध करणार? हे या बैठकीत स्पष्ट होणार आहे.
महापालिका प्रशासनाने ऍमेनिटी स्पेस भाडेकराराने विकसकांना देण्याचा प्रस्ताव स्थायीत ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला उपसूचना देत भाजपने यात आणखी आरक्षणाच्या 85 जागा विकसकामांना देण्याची उपसूचना मंजूर केली आहे. यावरून राष्ट्रवादीने भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करत विषयाविरोधात मतदान केले. त्यानंतर हा विषय मुख्यसभेत येताच पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रस्तावाबाबत काही अटी उपस्थित करत, भाजपने या अटी व मागण्या मान्य केल्यास या प्रस्तावास पाठिंबा देण्याचे सुतोवाच केले होते. त्यानंतर बुधवारी पक्षाच्या माजी शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनी “भाजपने आमच्या अटी मंजूर केल्यास या प्रस्तावास राष्ट्रवादी पाठिंबा देणार,’ असे जाहीर केले.
मात्र, गुरुवारी मुख्यसभेआधी राष्ट्रवादीच्या नगरसेवक बैठकीत खडाजंगी झाली आणि या प्रस्तावास राष्ट्रवादीने विरोध केला. त्यामुळे, भाजपने सभा तहकूब केली. मात्र, या प्रकाराने राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर येऊन ही बाब उपमुख्यमंत्री पवार यांच्यापर्यंत गेली. त्यामुळे पवार यांनी ही बैठक बोलवली आहे.
ठराविक पदाधिकाऱ्यांनाच निमंत्रण
या बैठकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने सरसकट सर्व नगरसेवकांना निमंत्रण न देता काही आजी-माजी पदाधिकाऱ्यांनाच बोलवले आहे. या प्रस्तावावरून वाद झालेल्या दोन्ही गटांचे पदाधिकारी असणार आहेत. त्यामुळे ही बैठकही वादळी ठरण्याची चिन्हे असली, तरी प्रस्तावासाठी उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी भाजपच्या राज्यस्तरीय नेत्यांनीच चर्चा करून मदत करण्याची विनंती केल्याची चर्चा आहे. त्याचवेळी प्रस्तावात महाविकास आघाडीतील कॉंग्रेस तसेच शिवसेनेचा विरोध असल्याने राष्ट्रवादीची या प्रस्तावाबाबतची भूमिका पालिकेतील इतर निर्णयाबाबतही परिणामकारक ठरण्याची चर्चा आहे.