पुरंदरमध्ये सर्वसामान्य जनतेला आधार देण्याची गरज : भविष्यात मोर्चेबांधणीला ‘ब्रेक’ लागण्याची शक्यता
आमोल बनकर
सासवड (पुणे) – पुरंदर तालुक्यातील करोनाचे प्रमाण वाढत आहे. गेल्या सहा महिन्यापासून जनता भरडून निघाली आहे. त्यातच तीन आठवड्यापूर्वी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना मरणकळा सोसाव्या लागत आहेत. मात्र राष्ट्रवादीचे काही नेते सध्या “नॉटरिचेबल’ आहेत. तर काही नेते घरातूनच कामकाज करीत आहेत. हायकमांड नेत्यांकडून ताकद मिळत नसल्याने कार्यकर्ते मात्र, नाउमेद झाले आहेत, अशी चर्चा तालुक्यात रंगली आहे.
भविष्यात येणाऱ्या ग्रामपंचायत, सहकारी संस्थांच्या, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांचा विचार करता राष्ट्रवादीची दुसऱ्या क्रमांकावरील फळी सक्रिय दिसत आहे; परंतु एक नंबरच्या फळीतले नेते मात्र, गायब आहेत. हेच नेते खासदार सुप्रिया सुळे किंवा पक्षाचे वरिष्ठ नेते आले की सर्वांत पुढे असतात.
- संभाजीराव झेंडे : काही अंशी मदतीचा हात
विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी माजी सनदी सेवानिवृत्त अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी जोरदारपणे ताकद लावत पक्षाची मोठी मोर्चेबांधणी केली होती; परंतु विधानसभेची जागा कॉंग्रेसला गेल्यामुळे एकंदरीतच नाराजीचा सूर उमटला होता; परंतु निवडणुकीमध्ये पुन्हा सक्रिय होऊन कॉंग्रेसचे उमेदवार संजय जगताप यांचा प्रचार त्यांनी केला. त्यानंतर मात्र करोनाच्या महामारीत सुरुवातीच्या काळात संभाजी झेंडे यांनी काही अंशी मदत केली मात्र, त्यानंतर ते पुरंदरमध्ये सक्रिय दिसत नाहीत.
- अशोक टेकवडे : व्यवसायावर लक्ष केंद्रीत
माजी आमदार अशोक टेकवडे हे देखील सध्या डेअरी व्यवसाय त्याचबरोबर पतसंस्था यांचा विस्तार वाढवुन व्यवसायाकडे लक्ष दिलेले आहे. परंतु पुरंदरच्या राजकारणामध्ये मध्यंतरीच्या काळात सक्रिय झाल्याचे पहावयास मिळाले होते. टेकवडे ग्रो या संस्थेच्या वतीने त्यांनी काही गावांमध्ये मदतीचा हातभार दिला होता; परंतु सध्या त्यांनीदेखील जनतेला दिलासा देणारा उपक्रम राबवण्याची गरज आहे. ते राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेते आहेत. त्यांच्याकडून अपेक्षा आहेत.
- प्रा. दिगंबर दुर्गाडे : थोडेफार सक्रीय
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक प्रा. दिगंबर दुर्गाडे यांना पुरंदर तालुक्यात बॅंकेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी मदत करता आली असती; परंतु त्यांनीदेखील मर्यादा आल्या आहेत. सध्या दुर्गाडे यांनी काही एनजीओच्या मदतीने स्वतःच्या गावांमध्ये मदत वाटप करीत आहेत. आमदारांच्या सोबत नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली आहे. तालुक्यात इतर कोठेही दुर्गाडे दिसले नाहीत.
- माणिक झेंडे : बैठकींना हजर
पुरंदर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून माणिक झेंडे पाटील हे आमदारांच्या सोबत तहसील कार्यालयातील व इतर बैठका सोडून कोठेही मदत करताना पाहावयास मिळत नाही.
- सुदाम इंगळे : घरीच राहणे पसंत
माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम इंगळे यांनी आपल्या वयोमानामुळे सध्या घरीच राहणे पसंत करीत आहेत. त्यामुळे पुरंदर तालुक्यात सध्या तेदेखील कुठे फिरताना दिसत नाहीत.
- आजी-माजी पदाधिकारीही शांतच
राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील कारखान्यांचे संचालक, मार्केट कमिटीचे संचालक माजी पंचायत समिती सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य हे देखील देखील शांततेत राहणे पसंत केल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीच्या दोन नंबर फळीतील कार्यकर्त्यांनी एनजीओच्या मदतीने तालुक्यातील किराणा किटचे त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूची मदत नागरिकांपर्यंत पोहोचवली होती.