वडाचे म्हसवे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता

माजी सभापती अरुणा शिर्के गटाचा दणदणीत विजय तर विरोधकांचे पानीपत

कुडाळ –
जावळी तालुक्‍यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या वडाचे म्हसवे ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पंचायत समितीच्या माजी सभापती व विद्यमान सदस्या सौ. अरुणा शिर्के यांच्या श्री जननीदेवी ग्रामविकास पॅनेल गटाने विरोधी काळुबाई ग्रामविकास पॅनेल गटावर मात करत 9 पैकी 8 जागांवर दणदणीत विजय मिळवला. म्हसवे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी त्यांच्याच गटाच्या सौ. विजया नामदेव पवार यांनी 301 मतांनी विजय संपादन करित ग्रामपंचातीवर निर्वावाद वर्चस्व राखले. निकालानंतर विजयी उमेदवारांनी व कार्यकर्त्यांनी जल्लोष करत गावातून मिरवणूक काढली.

वडाचे म्हसवे ग्रामपंचायतीच्या एकूण 10 जागांसाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत 3 जागा मतदानापूर्वीच बिनविरोध निवडून आल्याने व एक जागा रिक्त राहिल्याने एकूण 6 जागांसाठी प्रत्यक्ष मतदान झाले. त्यामध्ये जननीदेवी ग्रामविकास पॅनेलचे एकूण 8 उमेदवार विजयी झाले असून विरोधी काळुबाई ग्रामविकास पॅनेल गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे – अशोक साहेबराव शिर्के, राणी पोपट चव्हाण, प्रशांत पोपट शिर्के, अनिता विजय शिर्के, लक्ष्मण गणपत शिर्के, तर सरपंचपदी सौ. विजया नामदेव पवार आदी उमेदवार विजयी झाले तर अनिता जयवंत चव्हाण, रेखा रामचंद्र पवार व अनिता संजय गुरव आदी तीन सदस्या बिनविरोध निवडून आले आहेत.

जावळीच्या माजी सभापती अरूणा शिर्के व त्यांचे पती अजय शिर्के यांनी संजय शिर्के, रविंद्र शिर्के व यशवंत शिर्के यांच्या सहकार्यातून जननीदेवी ग्रामविकास पॅनेलचे नेतृत्व केले होते तर जावळीचे माजी उपसभापती तानाजी शिर्के यांच्या पाठिंब्याने कृष्णा शिर्के, नवनाथ शिर्के आदींनी विरोधी काळुबाई ग्रामविकास पॅंनेलल गटाचे नेतृत्व केले होते,
सर्व विजयी उमेदवारांचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी अभिनंदन केले.

काही विघ्नसंतोषी लोकांना राजकारणात अपयश आल्याने राजकीय आकसापोटी माझ्या व माझ्या पतींच्या विरोधात अपात्रतेसाठी नको तो खटाटोप केला. तसेच खालच्या पातळीवर उतरून खोट्या तक्रारीही दाखल करून बदनाम करण्याचा कुटील डाव खेळला होता. मात्र गावातील सुज्ञ जनतेने आमच्यावर विश्वास दाखवून विरोधकांना चांगलीच चपराक दिली आहे.

अरूणा शिर्के,माजी सभापती

Leave A Reply

Your email address will not be published.