गाठीभेटी, बैठका अन्‌ प्रचारफेरीने नगरमध्ये प्रचाराची सांगता

नगर: गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराचा धुरडा आज सायंकाळी 6 वाजता बसला. प्रचारासाठी आजचा शेवटचा दिवस देखील प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांनी गाठीभेटी, बैठका व प्रचारफेरी काढून मोठे शक्‍तीप्रदर्शन न करताच प्रचाराची सांगता केली. महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी ग्रामीण भागात गाठीभेटी व प्रचारफेरी काढून नगर तालुक्‍यातील वडगाव गुप्ता येथे प्रचाराची सांगता केली तर आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी पाथर्डी शहरात विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे यांच्या जाहीर सभेने प्रचाराची सांगता केली. तसेच युती व आघाडीच्या नेते व कार्यकर्त्यांनी आपआपल्या भागात प्रचारफेरी काढली.

लोकसभा निवडणुकीसाठी दि. 23 एप्रिल रोजी मतदान होत आहे. आज सायंकाळी 6 वाजता प्रचार थंडावला. प्रचारासाठी आज शेवटचा दिवस असतांनाही प्रमुख उमेदवार डॉ. विखे व आ. जगताप यांनी गाठीभेटी, बैठका व प्रचार फेरीवर भर दिला. डॉ. विखे यांनी नगर तालुक्‍यात तेही नगर शहरालगतच्या गावांमध्ये प्रचार केला.

रुईछस्तीशी पासून सकाळी प्रचाराला प्रारंभ केला. त्यानंतर दरेवाडी, नागरदेवळे, सोनगाव सात्रळ येथे प्रचार करून वडगावगुप्ता या गावात प्रचाराची सांगता केली. या गावांमध्ये डॉ. विखे यांनी गाठीभेटी घेवून प्रचार फेरी काढली. तर आ. जगताप यांनी नगर शहरात सकाळी प्रचार केला. त्यानंतर दुपारी पाथर्डीत मुंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेने प्रचाराची सांगता केली. आ. जगताप यांनी शहरात बाजार समिती परिसरात प्रचार फेरी काढून गाठीभेटी घेतल्या. सकाळी मार्केट यार्डमधील भाजी मार्केट मधील व्यापारी व शेतकरी नागरिकांच्या भेटी घेतल्या. यावेळी ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. अहमदनगर क्‍लबला भेट देऊन तेथील नागरिकांशी संवाद साधला. याठिकाणी डॉक्‍टर, वकील, उद्योजक, व्यापारी, क्षेत्रातील अनेक नागरिक उपस्थित होते.

डॉ. विखे व आ. जगताप यांनी आज आपले प्रचारासाठी नगर शहर व जवळपासच्या गावांना लक्ष्य केले होते. शहरात मोठे मतदार आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्र निर्णायक ठरणार आहे. त्यासाठी दोन्ही उमेदवारांना महापालिका क्षेत्राचा प्रचार केला. गेल्या पंधरा दिवसांपासून नगर दक्षिणेतील सहा विधानसभा मतदारसंघात दोन्ही उमेदवारांनी जास्तीत-जास्त गावांना भेटी देवून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. या दरम्यान, राज्य व राष्ट्रीयपातळीवर नेत्यांच्या सभा झाल्या. आज डॉ. विखेंच्या प्रचाराची सांगता कर्जतमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या जाहीर सभेने होणार होती. परंतू काही कारणास्तव ही सभा रद्द करण्यात आली. परंतू आ. जगताप यांच्यासाठी मुंडे यांची पाथर्डी जाहीर सभा झाली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.