मालेगाव – मालेगाव महापालिकेतील कॉंग्रेसच्या सर्व 28 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मालेगावमधील कॉंग्रेसचे सर्वेसर्वा माजी आमदार रशीद शेख आणि महापौर ताहिरा शेख यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली. या सर्वांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.
मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या पक्षाच्या कार्यक्रमात रशीद शेख, ताहिरा शेख यांच्यासह 28 नगरसेवकांनी पक्षांतर केले. यावेळी अजित पवार आणि मंत्री जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.
याआधी माजी आमदार असिफ शेख यांनी कॉंग्रेस सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आता त्यांचे वडील आमदार रशीद शेख आणि आई महापौर ताहिरा शेख आणि कॉंग्रेसच्या 28 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. रशीद शेख हे कॉंग्रेसचे निष्ठावंत मानले जात होते. एवढच नव्हे तर, रशीद शेख हे पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जात होते. मात्र, या कुटुंबाला आपल्याकडे खेचण्यात राष्ट्रवादीला यश आले आहे.
मालेगाव महापालिकेत एकूण 84 जागा आहेत. 2017 मध्ये मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत कॉंग्रेसचे सर्वाधिक 30 नगरसेवक निवडून आले होते. तसेच राष्ट्रवादीने 20 जागेवर विजय मिळवला. याशिवाय शिवसेना 12, एमआयएम 7 आणि जनता दल सेक्युरलला 7 जागा जिंकल्या होत्या.