माढ्यात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला शाबूत राहील?

संजय शिंदे यांच्यासमोर नाईक-निंबाळकर यांचे कडवे आव्हान

सोलापूर – माढा लोकसभा मतदार संघावर दबदबा असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बालेकिल्ला यावेळी अबाधित राहण्यासाठी आघाडीचे उमेदवार संजय शिंदे मोठे कष्ट घेत आहेत. भाजप युतीमधून प्रतिस्पर्धी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी त्यांना कडवे आव्हान दिले आहे.

वंचित बहुजन आघाडीने ऍड. विजयराव मोरे यांना उमेदवारी दिली आहे. माढा मतदारसंघात धनगर समाजाचे प्राबल्य असल्याने विजयराव मोरे हे धनगर समाजाची मते खेचण्याची शक्‍यता आहे. राष्ट्रवादीचा गड मानल्या जाणाऱ्या माढा मतदारसंघात राष्ट्रवादीचे संजय शिंदे आणि भाजपचे रणजित निंबाळकर यांच्यात अटीतटीची लढत होत आहे. दोन्हीही दलबदलू नेत्यांच्या फाइटमध्ये कोणता नेता सरस ठरणार याचे औत्सुक्‍य आहे.

देशातल्या प्रमुख लोकसभा मतदारसंघापैकी महत्त्वाचा मानला जाणारा माढा मतदारसंघ सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि त्याच वेगाने तो निर्णय मागेही घेतला. त्यामुळे पवारांच्या जागी कोण उमेदवार राहणार याची उत्सुकता होती.

2014मध्ये मोदी लाटेतसुद्धा पक्ष व स्वत:च्या प्रचार यंत्रणेच्या जोरावर विजयश्री मिळवणाऱ्या विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते यांना उमेदवारी मिळणे अपेक्षित होते. मात्र झाले उलटेच. कधी या मतदारसंघात माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख किंवा शरद पवार ही दोन्ही नावे ठेवण्यात आली. विजयसिंहांनी पुत्र रणजितसिंह यांच्यासाठी आग्रह धरला. मात्र राष्ट्रवादीच्या मंडळींनी त्यांच्या नावाला विरोध दर्शवला.

परिणामी रणजितसिंह मोहितेंनी भाजपचा घरोबा केला. तर इकडे भाजपच्या पाठिंब्यावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झालेले आणि मोहिते-पाटलांचे कट्टर विरोधक संजय शिंदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. पवारांनी थेट त्यांची माढा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केली. संजय शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना करमाळा विधानसभेचे कारण सांगून भाजपची ऑफरच धुडकावून लावत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाऊन तिकीट मिळवत मुख्यमंत्र्यांना मामा बनवले.

वास्तविक, राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे आणि भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांची पूर्वी खूप जवळीक होती. ते संजय शिंदे यांच्या आघाडीतही होते. मात्र, शिंदे यांनी राष्ट्रवादीत केलेला प्रवेश निंबाळकरांना रुचला नाही. त्यातूनच निंबाळकर यांची उमेदवारी पुढे आली.

परिचारक जाण राखतील ?
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदांच्या निवडीसाठी संजय शिंदे यांनी जिल्ह्यात एक नवी आघाडी उभी केली होती. या आघाडीत जिल्ह्यातील अनेक मातब्बर नेते सहभागी होते. त्यापैकीच विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक, बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत, मंगळवेढ्याचे समाधान आवताडे आदी नेते होते. ही मंडळी भाजपच्या गटात गेली आहेत. प्रशांत परिचारक यांचा आणि शिंदेंचा जुना याराना आहे. विधानसभेच्या निवडणुकीत संजय शिंदे यांनी परिचारक यांना राजकीय बळ दिले होते. याची ते जाण राखतील का याची चर्चा आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.