राष्ट्रवादीच्या आंदोलनाचा फज्जा

पक्षाच्या नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी फिरविली पाठ

पदे उपभोगणारेही आंदोलनापासून दूर

पिंपरी-चिंचवड महापालिकेत वर्षानुवर्षे पदे उपभोगणाऱ्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी आजच्या आंदोलनाकडे पाठ फिरविल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. अवघ्या तीन महिन्यांवर विधानसभा निवडणुका येऊन ठेपलेल्या असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसने आक्रमक होणे अपेक्षित आहे. आता तर हातात चांगला मुद्दा मिळालेला असताना आणि भाजपा विरोधात आक्रमक व्हा, असा आदेश खुद्द शरद पवार यांनी दिल्यानंतरही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील बोटचेपी भूमिका पुन्हा उघड झाली आहे.

पिंपरी – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाकडे पक्षाच्या नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरविल्याने या आंदोलनाचा फज्जा उडाला. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सांगितल्यानंतरही नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेत बदल झाला नसल्याचेच आजच्या आंदोलनातून समोर आले आहे.

राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या पदाचा दुरूपयोग करून बिल्डरधार्जिण निर्णय घेत राज्य शासनाचा 42 कोटींचा महसूल बुडविल्याचा निषेधार्थ शहर राष्ट्रवादीच्या वतीने पिंपरीतील आंबेडकर पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या नेतृत्त्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात बोटावर मोजण्याइतकेच कार्यकर्ते आणि नगरसेवक सहभागी झाले होते. विशेष बाब म्हणजे तीनही विधानसभा मतदारसंघातील विधानसभेच्या एकाही इच्छुकाने हजेरी लावली नाही.

चंद्रकांत पाटील यांनी घेतलेल्या निर्णयाची नि:पक्षपाती चौकशी होईपर्यंत त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी यावेळी केली. आंदोलनास नगरसेवक राजू मिसाळ, पंकज भालेकर, राजू बनसोडे, नगरसेविका संगीता ताम्हाणे, सुलक्षणा शिलवंत (धर), पक्ष प्रवक्ते फजल शेख, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे, सामाजिक न्याय महिला अध्यक्षा गंगा धेंडे, युवक प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, संदीप उर्फ लाला चिंचवडे, संजय लंके, अमोल भोईटे, बिपीन नाणेकर, आलोक गायकवाड, मयूर जाधव, सचिन औटे, संजय औसरमल, सनी डहाळे, प्रतीक साळुंके, दिनेश पटेल, कुंदन गोसावी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.