खुर्चीला घातला फळांचा हार; महापालिकेत येऊ न देण्याचा इशारा
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महासभेत उपमहापौर केशव घोळवे यांनी देशभरात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनासंदर्भात आक्षेपार्ह विधान केले होते. या विधानाबाबत उपमहापौर केशव घोळवे जोपर्यंत माफी मागणार नाहीत तोपर्यंत आंदोलन करण्याची घोषणा युवक राष्ट्रवादीच्या वतीने आज करण्यात आला. यावेळी उपमहापौरांच्या पालिका कक्षातील खुर्चीला फळांचा हार घालत त्यांच्या वक्तव्याचा निषेधही करण्यात आला.
मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत बोलताना केशव घोळवे यांनी दिल्लीतील आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना चीन आणि पाकिस्तानचे पाठबळ असून आंदोलनातील माणसे ही प्रती दिन तीनशे रुपये देऊन आणल्याचा आरोप त्यांनी केला होता. या विधानाच्या विरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने आज महापालिकेतील उपमहापौरांच्या कक्षामध्ये घोषणाबाजी करत निषेध
व्यक्त केला.
राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आल्याचे समजताच घोळवे यांनी त्वरीत ऍण्टी चेंबरचा आसरा घेतला. त्यावर राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी घोळवे यांनी बाहेर येऊन कालच्या विधानाबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली. घोळवे यांनी बाहेर येण्यास नकार दिला.
त्यानंतर मिसाळ आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोळवे यांच्या खुर्चीला शेतीफळांचा हार घालून जाहीर निषेध केला. जोपर्यंत माफी मागितली जात नाही, तोपर्यंत घोळवे यांना महापालिकेत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा मिसाळ यांनी दिला.
दरम्यान, जय जवान जय किसान, किसान एकता जिंदाबाद.. अशा घोषणा देण्यात आल्या. शेतकऱ्यांचा अवमान केल्याप्रकरणी घोळवे यांनी उपमहापौर पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली. यावेळी नगरसेवक मयूर कलाटे, पंकज भालेकर, युवकचे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर आदी उपस्थित होते.