पर्वती मतदारसंघासाठी राष्ट्रवादीचा शपथनामा

सहकारनगर –  कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुकुंदनगर येथे व्यापारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी पर्वती विधानसभा मतदार संघाच्या उमेदवार अश्‍विनी कदम यांच्या शपथनामा या जाहीरनाम्याचे प्रकाशन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

दि पूना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष पोपट ओस्तवाल, माजी अध्यक्ष वालचंद संचेती, उद्योगपती विठ्ठल मणियार, पुणे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष फतेचंद रांका,फामचे उपाध्यक्ष राजेश शहा, राजेश फुलपगार, खासदार वंदना चव्हाण, माजी खासदार रजनी पाटील, माजी आमदार मोहन जोशी, उल्हास पवार यांच्यासह आघाडीचे उमेदवार अश्‍विनी कदम, रमेश बागवे, दत्ता बहिरट, चेतन तुपे, अरविंद शिंदे आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले,आर्थिक मंदीचे परिणाम संपूर्ण देशात दिसत आहेत. राज्यात गेल्या काही महिन्यांत 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आर्थिक मंदी घालवणे आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी शासनाने पावले उचलून विश्‍वास निर्माण करणे गरजेचे आहे. मात्र, या विश्‍वासाला तडा गेला आहे. अनेक लहान मोठ्या कंपन्या अडचणीत आहेत. नोकऱ्या जात असल्याने त्या-त्या भागातील व्यापार व इतर गोष्टींवर परिणाम होत आहे. व्यापारामध्ये अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. ते सोडविण्यासाठी अभ्यासू, सुशिक्षित आणि समाजाशी नाळ असणारे उमेदवार निवडून देणे ही काळाची आहे. या भागातील विकास करण्यासाठी महाआघाडीने अशाच प्रकारचे उमेदवार उभे केले आहेत. व्यापारी वर्गाने त्यांच्या पाठीशी उभे राहावे आणि त्यांना निवडून आणावे, असे आवाहनही पवार यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.