जिल्ह्यात राष्ट्रवादी, तर शहरात भाजपला कौल

दिग्गजांना धक्‍का, यंग ब्रिगेडला संधी : कॉंग्रेसलाही यश, शिवसेनेला भोपळा

पुणे – जिल्ह्याच्या ग्रामीण भागात यावेळी मतदान वाढले, अन्‌ याचवेळी जिल्ह्यात प्रस्थापितांना धक्का बसणार यावर शिक्कामोर्तब झाले होते. मागीलवेळी केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसल यावेळी मतांचे भरभरून दान मिळाले. पिंपरी चिंचवड, पुणे शहर यांसह जिल्ह्यात निम्म्या (दहा) जागा मिळाल्या. कॉंग्रेसनेही मागीलवेळीे दुप्पट अशा दोन जागा मिळवल्या. यामध्ये विद्यमान आठ आमदारांना घरी बसावे लागले आहे. जिल्ह्यातील मातब्बर नेते व सलग चार टर्म मंत्री राहिलेले हर्षवर्धन पाटील यावेळी भाजपकडून लढले तरीदेखील त्यांच्या पदरी अपयशच आले.

पुरंदर, मावळमध्ये विद्यमान मंत्र्यांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला. तर गतवेळी रासपचे एकमेव आमदार राहिलेले राहुल कुल हे यावेळी भाजपच्या तिकिटावर निसटत्या मतांनी विजयी झाले. पिंपरी-चिंचवडमध्ये पिंपरीची जागा वगळता इतर दोन आमदारांनी पुन्हा बाजी मारली. तर शहरात हडपसर आणि वडगाव शेरीमध्ये राष्ट्रवादीने मुसंडी मारली.

आंबेगावात दिलीप वळसेंचा सप्तरंगी विजय

आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी 66 हजार 775 मतांनी शिवसेनेचे प्रतिस्पर्धी उमेदवार राजाराम बाणखेले यांचा पराभव केला. आंबेगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. तर शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचाही बालेकिल्ला मानला जातो. यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेकडून शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवाराची शोधाशोध करावी लागली. मात्र,अगदी खालच्या पातळीवर दिलीप वळसे पाटील यांच्यावर केलेली टीका मतदारांना रुचली नाही अन्‌ त्यांनी मतदानाद्वारे शिवसेनेवरील आपला राग व्यक्‍त करीत बाणखेले यांना घरचा रस्ता दाखवला. विकासकामांच्या जोरावर वळसे पाटील यांनी आपला सप्तरंगी विजय साजरा केला. वळसे पाटील यांच्या विजयात त्यांच्या कन्या पूर्वा वळसे पाटील यांनी घेतलेले कष्ट लक्षवेधी ठरले.

पुरंदरमध्ये जगताप यांचा राज्यमंत्र्यांना धक्‍का

पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे उमेदवार संजय जगताप यांनी शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांची हॅट्रीक रोखत त्यांचे कॅबिनेट मंत्रीपदाचे स्वप्नभंग केले. संजय जगताप यांनी 31 हजार 404 मतांनी शिवतारे यांचा पराभव केला. विजय शिवतारे यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे या स्टारप्रचारकांसह स्थानिक राष्ट्रवादी व मनसेतून भाजपमध्ये दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी प्रचार केला. मात्र, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या प्रचारापुढे तो कमी पडल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपबद्दल केलेले वक्‍तव्य, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर केलेली टीका, विजय शिवतारे यांच्या पराभवाचे कारण ठरले.

भोरमध्ये आमदार थोपटेंची “हॅट्‌ट्रीक’

भोर विधानसभा मतदारसंघ जिल्ह्यात तसा दुर्गम व मोठा समजला जातो. यात भोर, वेल्हे, मुळशी या तीन तालुक्‍यांचा समावेश आहे. गेल्या 2009 पासून येथील नेतृत्व आमदार संग्राम थोपटे करीत आहेत. मात्र, 2014 प्रमाणे यंदाही शिवसेना उमेदवार कुलदीप कोंडे यांनी आमदार थोपटे यांना जोरदार लढत दिली. शेवटच्या फेरीपर्यंत मतांची आकडेवारी वर-खाली होत होती, त्यामुळे कॉंग्रेससह शिवसैनिकांची घालमेल होत होती. अखेर 9 हजार 207 मतांनी आमदार संग्राम थोपटे यांचा विजय झाल्याचे घोषित करण्यात आल्याने महाआघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आणि भोर मतदार संघाचा गड राखल्यामुळे थोपटे यांचा विजयाचा आनंद द्विगुणित झालाण आमदार थोपटे यांनी हॅटट्रीक साधल्याने कार्यकर्त्यांच्या उत्साहालाही एकच उधाण आले होते.

कॅन्टोन्मेंटमध्ये पुन्हा फुलले कमळ

मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच प्रत्येक फेरीपासूनच चुरशीच्या ठरलेल्या कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून अखेर भारतीय जनता पक्षांचे उमेदवार सुनील कांबळे यांनी विजय मिळवित या मतदारसंघात पुन्हा कमळ फुलविले आहे. दरम्यान, या मतदारसंघाची मतमोजणी दोन वेळा थांबविण्यात आली. मतमोजणी सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच फेरीच्या वेळी 14 क्रमांक टेबलवरील मशिन मतदानानंतर चालूच असल्याचे समोर आले. त्यावर कॉंग्रेसने आपेक्ष घेतला. त्यामुळे जवळपास दीड तास मतमोजणी थांबली होती. त्यानंतर 14 व्या फेरीच्या वेळीही एक मशिन सील केले नसल्याचे समोर आले. त्यामुळेही सुमारे अर्धा तास मतमोजणी थांबविण्यात आली होती. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या मशिनवरील मोजणी शेवट करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेला नव्हता.

सिद्धार्थ शिरोळे यांचा संघर्षमय विजय
शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात अटीतटीच्या झालेल्या लढतीमध्ये शेवटच्या दोन फेऱ्यांमध्ये निर्णायक मताधिक्‍य मिळवत महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी गड राखला. वंचित बहुजन आघाडीच्या अनिल कुऱ्हाडे यांना 10 हजार 454 मते मिळाली. तर, शिरोळे येथून 5 हजार 124 मतांनी विजय मिळवला. त्यामुळे कुऱ्हाडे यांनी घेतलेल्या मताचा फायदा शिरोळे यांना झाला आहे. या मतदार संघात वंचित जायंट किलर ठरली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुहास निम्हण यांनी 5 हजार 254 मते मिळवली. हेही शिरोळे यांच्याच पथ्यावर असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

इंदापूरमध्ये केवळ “मामा’; भाजपला पाजले पाणी
इंदापूर विधानसभा मतदारसंघात यंदा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व विद्यमान आमदार दत्तत्रय भरणे यांच्यात तिसऱ्यांदा लढत रंगली. यात सलग दुसऱ्यांदा भरणे यांनी बाजी मारल्याने इंदापूरमध्ये केवळ “मामा’चेच राज्य असणार हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. हर्षवर्धन पाटील यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली. भाजपच्या नेतृत्त्वाखाली पाणी आणणार, असे आश्‍वासन दिले; मात्र, भाजपचे आश्‍वासन केवळ “गाजर’च असल्याचे मतदारांना पटवून देण्यात राष्ट्रवादी यशस्वी झाले. तर, विरोधात असूनही कोट्यवधींचा निधी खेचून आणत इंदापूर तालुक्‍यात विकासाची गंगा आमदार भरणे घेऊन आल्याचे मतदारांनी जाणले अन्‌ त्यातूनच भरणे यांना पुन्हा एकदा संधी दिली. आमदार भरणे 3 हजार 209 मतांनी निवडून आले.

जुन्नरमध्ये अतुल बेनकेच कारभारी
जुन्नर विधानसभा मतदारसंघात यंदा शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व अपक्ष महिला उमेदवार यांच्यात तिरंगी लढत झाली. शिवसेनेतून हकालपट्टी झालेल्या आशा बुचके यांनी अपक्ष उभे राहत अतुल बेनके यांच्यापेक्षा शिवसेनेचे उमेदवार शरद सोनवणे यांचा पराभव कसा होईल, याची चोख व्यवस्था केली होती. त्यात त्या यशस्वी झाली असल्या तरी त्यांना तिसऱ्यांदा पराभवाची चव चाखावी लागली. तर दोन शिवसैनिकांच्या भांडणासह पाण्यासाठी सलग 13 दिवस अतुल बेनके यांनी केलेले यशस्वी आंदोलन ही बेनके यांच्यासाठी जमेची बाजू ठरली. बेनके यांचे कष्ट, सत्यशील शेरकर, संजय काळे यांची सोबत, खासदार अमोल कोल्हे यांची मैत्री अतुल बेनके यांना आमदार करण्यात यशस्वी झाली. मतदारांनीही त्यांनाच पसंती दिल्याने अतुल बेनके जुन्नरचे नवे कारभारी ठरले आहेत.

चंद्रकांत पाटील यांचे स्वप्न अधुरेच
कोथरुड विधानसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे 25 हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी मनसेचे किशोर शिंदे यांनी चांगली लढत देत तब्बल 79,751 इतकी मते मिळवली. एक लाखाहून अधिक मतांनी विजयी होऊ,’ हा पाटील यांचा दावा मात्र फोल ठरला आहे. कोथरुडमध्ये एकूण 11 उमेदवार रिंगणात होते. प्रत्यक्षात लढत चंद्रकांत पाटील आणि किशोर शिंदे यांच्यातच होती. त्यामुळे निकालाबाबत मोठी उत्सुकता होती. त्यातच येथे 47 टक्के मतदान होत टक्केवारी घसरली. त्यामुळे निकालाबाबत मोठी उत्कंठा होती. फिरतो की काय असे वाटत होते. किशोर शिंदे यांनी चांगली लढत देत पाटील यांचे एक लाखांहून अधिक मतांनी निवडून येण्याचे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही.

वडगावशेरीत ‘राष्ट्रवादी पुन्हा’
वडगावशेरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुनील टिंगरे यांनी 4 हजार 956 एवढे नताधिक्‍य घेत महायुतीचे जगदीश मुळीक यांचा धक्कादायक पराभव केला आहे. सन 2014 मध्ये भाजप-जगदीश मुळीक-66 हजार 908, राष्ट्रवादी कॉंग्रेस-बापू पठारे -44 हजार 480, कॉंग्रेस-चंद्रकांत छाजेड-12 हजार 497, मनसे-नारायण गलांडे-18,803 मते मिळाली होती. सुनील टिंगरे यांनी शिवसेनेतर्फे उमेदवारी मिळवून निवडणूक लढविली होती. यात टिंगरे यांना 61 हजार 583 एवढी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. यंदा सुनील टिंगरे यांनी मागील निवडणुकीच्या पराभवाची परतफेड केली आहे.

दौंडमध्ये कुल यांनी जागा राखली…
दौंड विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार राहुल कुल व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार रमेश थोरात यांच्यात प्रचाराच्या प्रारंभापासूनच काटे की टक्‍कर रंगली होती. ही लढाई मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत कायम होती. केवळ 675 मतांनी भाजपचे राहुल कुल यांनी बाजी मारत भाजपची जागा राखली. दरम्यान, रासप की भाजपच्या चिन्हावर कुल निवडणूक लढवणार यात राजकीय नाट्य रंगले होते. अखेर “कमळा’वर शिक्‍कामोर्तब झाले अन्‌ प्रचाराचा धुराळा उडाला. त्यातही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. मतमोजणीही उत्कंठावर्धक झाली, शेवट्या फेऱ्यांत काही गडबडही झाली. अखेर राहुल कुल यांनी राष्ट्रवादीचे मात्तबर रमेश थोरात यांच्यावर 675 मतांनी मात केली. जो विजेता तोच सिंकदर असतो. यामुळे दौंडमध्ये कुल हेच पुन्हा एकदा सिंकदर ठरले.

बारामतीत अजित पवारच ‘दादा’
बारामती विधानसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हेच “दादा’ असतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. ते तब्बल 1 लाख 65 हजार 641 मतांनी निवडून आले. 2014मधील त्यांनी स्वत:चाच सव्वालाख मतांनी निवडून येण्याचा विक्रम मोडला. तर भाजपने स्थानिकांना डावलत आयाराम उमेदवार गोपीचंद पडळकर यांना संधी दिली. मात्र, त्यांचे डिपॉझिटही जप्त झाल्याने भाजपसाठी हे मोठी नाचक्‍की ठरली आहे. स्थानिकांना डावलत भाजपने आयारामला संधी दिल्याने स्थानिक भाजपचे नेते प्रचंड नाराज होते. त्यांनी जरी उमेदवाराचा प्रचार केला असला तरी तो मनापासून न करता एकप्रकारे अजित पवार यांना अप्रत्यक्षरित्या साथ दिल्याचे निकालानंतर स्पष्ट होत आहे. या “आयाराम’ राजकारणामुळे भाजपमध्ये पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना संधी दिली जात नाही हे अधोरेखीत झाले आहे.

खडकवासल्याची निवडणूक चर्चेत राहिली
खडकवासला विधानसभा मतदारसंघात महायुती आणि आघाडीची चांगलीच चुरस पहायला मिळाली. अखेर या चुरशीच्या लढतीमध्ये महायुतीचे भीमराव तापकीर यांच्या हातातून निसटत चालेला विजय शेवटच्या टप्प्यात हातात आला. 2014 मध्ये भीमराव तापकीर यांना 63 हजारांचे मताधिक्‍य मिळाले होते. यावेळी मताधिक्‍यांमध्ये वाढ होईल, अशी शक्‍यता महायुतीला होती. परंतु, यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून नवीन चेहरा देण्यात आला. त्यामुळे तापकीर यांना विजय मिळविताना आखाड्यात चांगलीच लढत द्यावी लागली.’ त्यावेळी कुठे अडीच हजारांचे मताधिक्‍य मिळवत यश मिळाले. त्यामुळे खडकवासल्याची निवडणूक चांगलीच चर्चेत राहिली.

भोसरी भंडाऱ्यात न्हाली
भोसरी विधानसभा मतदारसंघात सुरुवातीपासून आघाडीवर असलेल्या भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या कार्यकर्त्यांनी दुपारी 12 वाजल्यापासून जल्लोषाला सुरुवात केली. ते सलग दुसऱ्यांदा निवडून आले. भंडाऱ्याची मुक्त उधळण करत विजयाचा जल्लोष करण्यात आला. श्री शिवछत्रपती क्रीडासंकुलाच्या बाहेर आमदार महेश लांडगे येताच तिथे थांबलेल्या कार्यकर्त्यांनी एकच जयघोष केला. त्यावेळी पैलवान असलेल्या लांडगे यांनी शड्डू ठोकून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला होता. मतदार संघातील मुख्य चौकांसह आमदार लांडगे यांच्या कार्यालयाबाहेर भंडाऱ्याची मुक्त उधळण करण्यात आली. त्यामुळे भोसरी भंडाऱ्यात न्हाल्याचे पहायला मिळाले.

‘खेड-आळंदी’त मोहितेच ठरले “किंग’
खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात आजी-माजी आमदारांसह भाजप बंडखोर अपक्ष उमेदवार या तिघांमध्ये जोरदार लढाई रंगली. मात्र, या लढाईत महायुतीतील शिवसेना-भाजपच्या भांडणाचा राष्ट्रवादी कॉंग्रेसने लाभ उचलत विजयी टिळा आपल्या माथी लावला. येथे राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील यांनी 2014च्या पराभवाचा वचपा 2019च्या निवडणुकीत काढत खेड-आळंदी मतदारसंघात आपणच “किंग’ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. मागीलवेळी नाराज असलेले राष्ट्रवादीचे नेत यावेळी दिलीप मोहिते यांच्यासोबत राहिले. त्यांनी शिवसेनेचे सुरेश गोरे यांचा तब्बल 33 हजार 242 मतांनी पराभव केल्याने दिलीप मोहिते पाटील यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली. तर शिवसेनेला भाजप उमेदवाराची बंडखोरी भोवली असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

शिरूर-हवेलीत अशोक पवारच ‘राजा’
शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात माजी आमदार ऍड. अशोक पवार 41 हजार 504 मतांनी निवडून आले. त्यांनी भाजपचे आमदार बाबुराव पाचर्णे यांना पराभवाची धूळ चारली. पाचर्णे यंदाच्या निवडणुकीत हवेत होते. भाजपने केलेल्या विकासकामांमुळे मी विजयी होणारच असा फाजील आत्मविश्‍वास त्यांना नडला. तसेच शिरूर-हवेलीत हवे तशी विकासकामे न झाल्याने त्यांना पराभव पत्करावा लागला. 2014मध्ये आमदारकी गेल्याने त्याचा धडा घेत नागरिकांच्या सुख-दु:खात अशोक पवार कायम सहभागी झाले. आतापर्यंतच्या निवडणुकीत 10 हजारांपेक्षा अधिक मताधिक्‍क्‍याने कोणताही उमेदवार निवडून आला नव्हता. मात्र यंदा पवार तब्बल 41 हजारहून अधिक मताधिक्‍क्‍याने निवडून आले आहेत.

कसब्याचा गड मुक्ता टिळक यांनी राखला
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार महापौर मुक्ता टिळक यांनी विजय मिळविला आहे. टिळक यांनी कॉंग्रेसचे उमेदवार महापालिकेचे गटनेते अरविंद शिंदे यांचा 28 हजार 196 मतांनी पराभव केला आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाचा गड भाजपने कायम राखत पुन्हा एकदा कसबा विधानसभा मतदारसंघ हा भाजपचाच बालेकिल्ला असल्याचे सिद्ध झाले आहे. कसबा विधानसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा घेतली होती. त्याचा फायदा या टिळक यांना झाला. तर कॉंग्रेसच्या प्रचारासाठी शहरात कोणत्याही बड्या नेत्यांची सभा झाली नाही. तसेच कॉंग्रेसच्या काही नेत्यांच्या सभा ठरल्या होत्या. मात्र, नियोजनाच्या अभावामुळे एका बड्या नेत्याची सभा ऐनवळी कॉंग्रेसला रद्द करावी लागली होती. याचा फटका कॉंग्रेसला बसला असल्याचे बोलले जात आहे.

माधुरी मिसाळ यांनी विजयाची हॅटट्रीक
पर्वती मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजय मिळवीत भाजपच्या माधुरी मिसाळ यांनी विजयाची हॅटट्रीक साजरी केली. पहिल्या फेरीत मिसाळ यांनी 1 हजार मतांची आघाडी घेतली. त्यानंतर सहाव्या फेरीपर्यंत 700 ते 800 दरम्यान आघाडी कायम होती. मात्र, सातव्या फेरीत अश्‍विनी कदम यांनी 312 मताची आघाडी घेतली होती. त्यामुळे ही लढत अत्यंत चुरसीची होण्याची चिन्हे होती. मात्र, त्यानंतरच्या फेरीनंतर मिसाळ यांची जवळपास 10 हजारांपुढे आघाडी कायम ठेवत विजयाकडे मार्गक्रमण केले. शेवटच्या फेरीतपर्यंत मिसाळ आघाडीवर होत्या. विसाव्या फेरीत त्यांना 35 हजार 405 इतके मताधिक्‍य मिळाले. अखरेच्या दोन फेरीतही मताधिक्‍य मिळवित मिसाळ यांच्या विजयावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले.

मावळात सुनील शेळके जायंट किलर
मावळात सुनील शेळके यांच्या रुपाने मावळ तालुक्‍यात भारतीय जनता पक्षाला 25 वर्षांनंतर धूळ चारण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला यश आले. या निर्भळ यशानंतर मावळ तालुक्‍यात खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी कॉंग्रेसने दिवाळी साजरी केली. गावागावात सुनील शेळके यांच्या विजयाचे तोरण लावत गुलालाची उधळण करीत फटाके फोडण्यात आले. त्यानच्या घवघवीत विजयानंतर शेळके यांनी सायंकाळी देहूतील मुख्य मंदिरात श्री विठ्ठल-रखुमाई आणि जगद्‌गुरू संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी देहू संस्थानतर्फे सुनील शेळके यांचा शाल-नारळ देऊन सन्मान करण्यात आला आणि त्यांच्या आमदारकीच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.