विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी नव्या चेहऱ्यांना संधी देणार

मुंबई – लोकसभा निवडणूकीतील पक्षाचा पराभव जिव्हारी लागल्याने पराभवाची मालिका थांबवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आगामी विधानसभा निवडणूकीत नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी त्यादृष्टीने विचारही सुरु केला असल्याची माहिती पक्षाच्या एका सुत्राने दिली.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला. संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादीने अवघ्या 5 जागा जिंकल्या. तर शिवसेना-भाजपा महायुतीने घवघवीत विजय मिळवला. त्यामुळे परभवाची मालिका खंडीत करण्यासाठी राष्ट्रवादीने नवी रणनिती आखली असल्याचे समजते. चार महिन्यानंतर विधानसभेची निवडणूक होणार आहे.

ही निवडूक राष्ट्रवादीसाठी ‘जिंकू किंवा मरू’ अशी राहणार आहे. त्यामुळे विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा विचार करीत आहे, असे सुत्रांनी सांगितले. 2014 च्या विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 41 उमेदवार जिंकून आले आहेत. आता चार महिन्यानंतर होणाऱ्या निवडणूकीत कॉंग्रेससोबत होणाऱ्या जागावाटपात 50-50चा फॉर्म्युला ठरल्यास राष्ट्रवादीला 144 जागा मिळतील. त्यामुळे अनेक जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयोग राबवता येईल, असेही सुत्रांनी सांगितले.

शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना केल्यानंतर 1999 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली होती. त्यावेळी अनेक आमदार जिंकून आल्यानंतर पवारांनी कॉंग्रेसशी हातमिळवणी करीत राज्यात सरकार स्थापन केले होते. यासंदर्भात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांना विचारले असता ते म्हणाले, पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्यानंतर विधानसभा निवडणूकीत अनेक तरूण उमेदवारांना संधी दिली आहे. त्यांनी तरूणांना नेहमीच प्रोत्साहित केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.