पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेवर राष्ट्रवादीचीच सत्ता येणार आणि महापौरही राष्ट्रवादीचाच होणार, असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते व माजी महापौर योगेश बहल यांनी व्यक्त केला. दै. प्रभात कार्यालयातील गणरायाचे दर्शन बहल यांनी घेतले. त्यानंतर बोलताना बहल म्हणाले, “”सध्या राजकारणात कोणाचीच कोणावर निष्ठा राहिलेली नाही. मोदी लाटेत भाजपला निवडून दिल्यामुळे मतदारांना पश्चाताप झाला आहे.
त्यामुळे आगामी काळात शंभर टक्के राष्ट्रवादीचीच सत्ता येईल. भाजपने भयमुक्तपणे कोट्यवधी रुपयांचा भष्ट्राचार केला आहे. खोटे कागदपत्र, खोटे एफडीआर, खोटे ठेकेदार यांच्या माध्यमातून भाजपने भ्रष्टाराचाचा कहर केला आहे. आता मतदारांनाच सत्तापालट करायचा आहे. महापालिकेत स्थानिक नेत्यांची दादागिरी आहे. कचरा आणि रस्ता साफसफाईच्या निविदेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार आहे. कुत्र्यांची नसबंदी आणि करोनाच्या काळात रुग्ण दाखल नसताना कोट्यवधी रुपयांची बिले देण्यात आली आहेत.
स्थानिक नेत्यांच्या दादागिरीला कंटाळून भाजपातील अनेकजण राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत, असा दावाही राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बहल यांनी केला आहे. भाजपने पाच वर्षांत एकही जनहिताचे काम केले नाही. महागाईमुळे गरिबांनी जगायचे कसे. शिक्षण आणि वैद्यकीय उपचारातही मोफत सुविधा दिल्या जात नाही. राष्ट्रवादीच्या काळातील विकासकामे हाच आमचा आगामी निवडणुकीसाठी अजेंडा असणार आहे. दिल्ली पॅटर्नप्रमाणे शहरात इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणार आहोत. शहरात विकासाची गंगा आणणाऱ्या पक्षाला जनतेने कौल द्यावा, अशी प्रार्थना आपण गणरायाच्या चरणी करणार आहोत.