राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अभेद्य राहणार

कराड उत्तरमध्ये आ. बाळासाहेब पाटील यांनी केली उदयनराजेंचीच पाठराखण
कराड उत्तर निवडणूक राजकीय विश्‍लेषण

कराड  – कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाने आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशात आणि राज्यातही मतदारसंघातील कॉंग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनाच अडचणीच्या काळात मताधिक्‍क्‍य देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. त्यामुळे भविष्यात कराड उत्तर मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अभेद्य राहणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

उदयनराजे भोसले यांचे जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाच्या सर्वच आमदार व पदाधिकाऱ्यांसमवेत ऋणानुबंध आहेत. निवडणुकीपूर्वी आमदारांनी उदयनराजेंच्या उमेदवारीला विरोध दर्शविला होता. मात्र, पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी नाराज आमदारांची मोट बांधून पुन्हा एकदा उदयनराजे यांचीच उमेदवारी फायनल केली. यावेळी आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदारांना पुन्हा निवडून आणण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे. त्यामुळेच आमदारांनी यापूर्वी घडलेल्या घटना, हेवेदावे बाजूला ठेवत पक्षनिष्ठेला महत्व देत उदययनराजेंचे काम केले.

कराड उत्तर मतदारसंघाच्या सन 2009 आणि 2014 च्या विधानसभा निवडणुकीसह जिल्हा बॅंक आणि इतर निवडणुकीमध्ये खासदार आणि आमदार बाळासाहेब पाटील यांचे ताणलेले संबंध संपूर्ण जिल्ह्याने पाहिलेले आहेत. तरीही पक्षाचा आदेश प्रमाण मानत आमदार पाटील यांनी भविष्यातील अडचणी जाणून या निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केले. यात ते यशस्वी झाल्याचे निवडणुकीतील मतांच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.

या विधानसभा मतदारसंघात तिरंगी अथवा चौरंगी होणारी लढत आजपर्यंत आमदार बाळासाहेब पाटील यांच्या पथ्यावर पडली आहे. विरोधी असलेल्या धैर्यशील कदम आणि मनोज घोरपडे यांच्या मतांची बेरीज केली तर आमदार पाटील यांच्यापेक्षा अधिक होत आहे. भविष्यात हे दोन गट एकत्रित आले तर राष्ट्रवादी पक्षाला अडचणीचे ठरण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे आमदार पाटील यांनी या निवडणुकीत सर्व शक्‍ती पणाला लावून उदयनराजेंना मताधिक्‍क्‍य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. ते प्रयत्न यशस्वी झाल्यामुळेच भोसले यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत उदयनराजेंना आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विजयासाठी प्रयत्न करावेच लागतील, असे सर्वसामान्य कार्यकर्त्यांतून बोलले जात आहे. साहजिकच या मतदारसंघातील आगामी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीसाठी सोपी ठरणार आहे. मात्र, महायुतीला या मतदारसंघावर वर्चस्व गाजवायचे असेल तर त्यांना युतीची संपूर्ण ताकद पणाला लावावी लागेल, हेही तितकेच खरे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.