पुणे -शहरातील विकासकामे दाखवण्यासाठी भाजपने बॅनरबाजी सुरू केली आहे. याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसने सोशल मीडियाच्या माध्यमातून “विकासाची पोलखोल’ स्पर्धा आयोजित केली आहे.
शहरातील पायाभूत सुविधांसह, कचरा, रस्ते, सांडपाणी, वाहतूक समस्या सेल्फी अथवा व्हिडिओद्वारे सोशल मीडियावर टाकणाऱ्यांसाठी ही स्पर्धा असणार आहे. त्यासाठी सेल्फी आणि व्हिडिओ विजेत्या स्पर्धकांना प्रत्येकी 11 हजार 101 रुपयाचे बक्षीस पक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे.
दि. 17 ते 26 ऑगस्ट या कालावधीसाठी ही स्पर्धा घेतली जाणार असून, त्यासाठी राष्ट्रवादीकडून “पोलखोलपुणे’ या हॅशटॅगचा वापर करून फेसबुक, ट्विटर तसेच इन्स्टाग्रामवर सेल्फी आणि व्हिडिओ पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
“शहरातील पायाभूत सुविधांची वाताहत झाली आहे. तर, भाजपकडून पुणेकरांची दिशाभूल करणारी फ्लेक्सबाजी सुरू आहे. हा फोलपणा उघड करण्यासाठीच ही स्पर्धा आयोजित केली असून नागरिकच भाजपला त्यांचा विकास दाखवून देतील. यासाठीच ही स्पर्धा घेतली आहे,’ असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.