माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षबदलाच्या चर्चेचा परिणाम
– नीलकंठ मोहिते
रेडा – राज्याचे माजी सहकारमंत्री व कॉंग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार, या बातम्यांचे पेव इंदापूर तालुक्यातील गावागावात फुटल्याने तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना मात्र या चर्चेमुळे राजकीय गुदगुल्या होत आहेत. पाटील यांचा कधी कोणत्या पक्षात प्रवेश होईल, या चर्चेला उधाण आल्याने विधासनसभेसाठी प्रबळ इच्छुक असलेले दत्तात्रय भरणे आणि प्रविण माने गट सरसावले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, हर्षवर्धन पाटील हे मागील सहा महिन्यांपासून भाजप नेत्यांच्या संपर्कात तसेच चर्चा करीत आहेत. यामुळे ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार, कॉंग्रेस पक्षावर हर्षवर्धन पाटील नाराज, अशा बातम्यांचे पीक सर्वत्र फोफावले आहे. यामुळे इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मात्र भलतेच खूश आहेत.
सुटांचा वाचून खोकला गेला… अशी तिखट प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे कार्यकर्ते खुलेआम व्यक्त करीत आहेत. तर, कॉंग्रेसचे सच्चे कार्यकर्ते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी तात्काळ भाजप प्रवेश करावा तरच तालुक्यात निश्चित बदल घडेल, असा आशावाद बोलून दाखवत आहेत. परंतु, याच करणातून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या व विद्यमान जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांची जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीवर झालेली नाही. यातून पाटील यांचे कॉंग्रेसशी वितुष्ट आल्याची चर्चा आहे. परंतु, गेल्या राजकारणात तावून सुलाखून निघालेले हर्षवर्धन पाटीलही आता सावध पावले टाकत आहेत. तालुक्यातील जनतेचे मत जाणून घेण्याकरीता ते गावभेट दौरा करीत आहेत. यामध्ये ते मी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना मोठी ताकत लावून विजय केले आहे. आघाडी धर्माचे पालन तंतोतंत केले आहे, त्यामुळे मित्रपक्ष असलेला राष्ट्रवादी कॉंग्रेस मला विधानसभेला संधी देऊन आघाडी धर्म पाळेल, असा आशावाद व्यक्त करीत आहेत. यामुळे पाटील हे कॉंग्रेसमध्ये राहणार, राष्ट्रवादी आघाडी धर्म पाळणार की भाजप प्रवेश नक्की होणार, अशा संभ्रमात जनताही पडली आहे.
…यामुळे कॉंग्रेस कार्यालय केले रिकामे
हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगत असताना इंदापूर शहरातील कॉंग्रेसचे मुख्य कार्यालय गेल्या काही दिवसांपासून अद्ययावत करण्याकरिता रिकामे केले जात आहे. या कार्यालयातून कॉंग्रेसच्या कार्यालयातून कागदपत्रे व साहित्यही काढण्यात आले आहे. हे सर्व साहित्य माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या एका संस्थेच्या कार्यालयात ठेवण्यात आले आहे. यामुळे पाटील हे कॉंग्रेसला नक्की डच्चू देणार, अशा चर्चेवर आपोआपच शिक्कामोर्तब झाल्यासारखे सर्वांना वाटत आहे. तर, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील मातब्बरही कॉंग्रेसचे कार्यालय खाली झाले, याच अर्थ ओळखा, असे सांगून यात भर टाकत आहेत.