मुंबई : आयएल अॅण्ड एफएस कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार व संशयास्पदरित्या कर्जाचे वाटप केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज ईडी चौकशी होणार आहे. समन्स बजावल्यानंतर आज सकाळी जयंत पाटील हे ईडी कार्यालयात हजर झाले आहेत. दरम्यान, या प्रकरणी त्यांचा जबाब नोंदवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, ईडी चौकशीसाठी रवाना होण्याआधी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना ,“शांतता आणि कायद्याने जे प्रश्न विचारले जातील त्याची उत्तरे मी देणार आहे. सर्वांना एकच आवाहन आहे की सर्वांनी शांतता राखावी. आपण विरोधी पक्षात आहोत, त्यामुळे काही गोष्टी सोसाव्या लागणारच ना. सगळंच कसं सहजासहजी होईल. काही गोष्टी होत असतात.” असे त्यांनी म्हटले आहे. जयंत पाटील यांच्या ईडीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे समर्थक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त झाले असून त्यांनी याविरोधात भाजपा आणि ईडीविरोधात आंदोलन पुकारले आहे.
आज सकाळी ११ वाजता मी ईडी कार्यालयात उपस्थित राहणार आहे. ईडीचे समन्स आल्यापासून मला राज्यभरातून माझ्या पक्षातील व इतर मित्र पक्षांतील पदाधिकाऱ्यांचे फोन येत असून राज्यभरातून लोक आज ईडी कार्यालयाबाहेर येत असल्याचे मला समजत आहे.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) May 22, 2023
तर ईडी चौकशीला हजर राहण्याआधीच जयंत पाटलांनी ट्वीट केले होते. त्यात त्यांनी “आज सकाळी ११ वाजता मी ईडी कार्यालयात उपस्थित राहणार आहे. ईडीचे समन्स आल्यापासून मला राज्यभरातून माझ्या पक्षातील व इतर मित्र पक्षांतील पदाधिकाऱ्यांचे फोन येत असून राज्यभरातून लोक आज ईडी कार्यालयाबाहेर येत असल्याचे मला समजत आहे, असे म्हटले आहे. पुढे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये “माझी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विनंती आहे की, कोणीही मुंबईला येऊ नये. मी या चौकशीकामी ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार असून आपण सर्वांनी माझ्याप्रती दाखवलेल्या प्रेमाबद्दल मी आपला आभारी आहे”, असेही म्हणाले आहेत.
जयंत पाटील राज्याचे माजी गृह आणि माजी अर्थमंत्री आहेत. तसेच ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. सातवेळा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. पाटील यांना शुक्रवारी सकाळी जबाब नोंदवण्यासाठी ईडीने बोलावले होते. पण त्यांनी या समन्सबाबत ईडीला पत्र लिहून वेळ मागून घेतली होती. त्यानुसार ईडीने जयंत पाटील यांना आठवड्याभराची मुदत दिली आहे. पाटील यांना ईडीने दुसरे समन्स बजावले असून त्यात २२ मे रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते. त्यानुसार ते आज कार्यालयात हजर राहिले आहेत.