‘चंपा’ साडी सेंटरचे फलक घेऊन राष्ट्रवादीचे आंदोलन 

पुणे – कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमदेवार चंद्रकांत पाटील विजयी झाले. या विजयानंतर चंद्रकांत पाटील यांनी भाऊबीजेनिमित्त कोथरूडमधील महिलांना साडी वाटप केले. यावर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली असून त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुण्यातील खंडोजीबाबा चौकात आंदोलन केले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी निकृष्ट दर्जाच्या साड्या वाटल्या असल्याचा आरोपही राष्ट्रवादीने केला आहे.

राष्ट्रवादीने चंपा साडी सेंटर असे फलकावर नाव लिहला असून भूखंडचा भ्रष्टाचार करून बक्कळ पैसे कमावणार व पुढची पाच वर्षे पुण्याला भरपूर लुटणार, असाही मजकूर लिहला आहे. तसेच पुणेकर महिलांचा अपमान करणाऱ्या चंपाचा विजय असो. आम्हाला नको चंपा साडी, आम्हाला हवी विकासाची गाडी, अशी घोषणा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दिल्या आहेत.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांना कोथरुडमधून उमेदवारी जाहीर झाल्यापासून भाजपअंतर्गत अनेक वाद निर्माण झाले होते. त्यामुळे भाजपच्या गडात पाटील विक्रमी मताधिक्याने निवडून येतील, असा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्षात पाटील यांना २६ हजारांचे मताधिक्य मिळाले. मनसेचे किशोर शिंदे हे विरोधकांचे संयुक्त उमेदवार होते.

Leave A Reply

Your email address will not be published.