धाराशिव : अजित पवारांनी अलीकडेच बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळेंविरोधात उमेदवारी देणं चूक असल्याचं वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यची राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली. अजित पवारांचे हे विधान ऐकून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. अजित पवारांच्या या वक्तव्यावर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादील नेते जयंत पाटील आणि रोहित पवार यांनी खिल्ली उडवली आहे.
काय म्हणाले जयंत पाटील?
‘इव्हेंट मॅनेजरने अजितदादांना असं सांगितलं असेल कि सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उमेदवारी देणं चूक झाली, असं बोला, त्यामुळे अजितदादा असे बोलले असावे. सद्या दादा इव्हेंट मॅनेजरचं जास्त ऐकतात, त्यांनी सांगितलं असेल की हे फायद्याचं आहे तर ते बोलले असतील. पण भाजपसोबत गेलो ही चूक झाली असं ते बोलले तर ते खरं वाटेल’ असा टोलादेखील जयंत पाटलांनी लगावला आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
‘दादा काल बोलले चूक झाली. भाजपचे नेते उलटा प्रचार करतात की तो निर्णय दादांचाच आहे. पण आम्हाला वाटतं तो निर्णय दादांचा नसावा. पूर्वीचे दादा आणि आताचे दादा यात फरक वाटतो. दादा दिल्लीतील नेत्यांसमोर झुकतात’ अशी टीका रोहित पवारांनी केली तसेच अजितदादा जर मनापासून अशाप्रकारे सकारात्मक वक्तव्य करत असतील आणि त्यांच्या मनातून हे येत असेल तर चांगली गोष्ट आहे, असंही रोहित पवार म्हणाले.
डिझाईन बॉक्स नावाच्या कंपनीला काम दिलेलं आहे, त्या कंपनीने लिहून दिलेलं दादा बोलत असतील तर दादा खरंच बदललेत असं म्हणावं लागेल. 200 कोटी खर्च करून एखाद्या एजन्सीने दिलेले सल्ले दादा ऐकत असतील तर आश्चर्य वाटतं, असा टोला यावेळी रोहित पवारांनी अजितदादांना लगावला.