इंदापुर – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांच्याबद्दल प्रसार माध्यमातून खंडणी विरोधी पथकाकडून चौकशी सुरू असल्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत, त्यामुळे पक्षाची नाहक बदनामी होत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी मंगलदास बांदल यांना पक्षातून निलंबित केले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.
प्रसारमाध्यमांतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांची खंडणी विरोधी पथकाकडून चौकशी सुरू असल्याबाबतच्या बातम्या काही दिवसांपासून प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे पक्षाची बदनामी होत असल्याने मंगलदास बांदल यांना पक्षातून निलबिंत करण्यात येत आहे. pic.twitter.com/kB723WjBho
— NCP (@NCPspeaks) March 14, 2020
इंदापुर येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर बोलत होते. यावेळी इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष अमोल भिसे, नगरसेवक अनिकेत वाघ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
बांदल यांच्याबद्दल पक्षाने गंभीर दखल घेतलेली आहे, प्राप्त झालेल्या प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून कारवाई केली जाणार आहे. पक्षाच्या प्रतिमेला जर धक्का लागत असेल तर, पक्ष स्तरावरून कारवाई तत्काळ केली जाते. एखाद्या नेत्याचे विचार म्हणजे ते पक्षाचे विचार नसतात, अशा चुकीच्या नेत्यांच्या विचाराच्या अपप्रवृत्तीला कधीही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष खतपाणी घालत नाही. याचाच भाग म्हणून पक्ष स्तरावरून मंगलदास बांदल यांचे निलंबन करण्यात येत आहे.