राष्ट्रवादीच्या आमदारांनी साताऱ्यात शब्द केला खरा

चारही मतदारसंघात मताधिक्‍य, माढ्यात मोहिते-पाटील ठरले जायंट किलर

माढा लोकसभा मतदार संघ
सातारा लोकसभा मतदार संघ

सातारा – देशात नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या लाटेत साताऱ्याचा गड राखण्यात राष्ट्रवादीला यश मिळाले. लोकसभा मतदारसंघातील सहापैकी चार विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार प्रतिनिधीत्व करत आहेत. चारही विधानसभा मतदारसंघात खा. उदयनराजेंना मताधिक्‍य मिळाले. त्यावरून आमदारांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांना दिलेला शब्द खरा करून दाखविला.

दुसऱ्या बाजूला माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा गड काबीज करण्यात भाजपला यश मिळाले असून त्यामध्ये तब्बल 1 लाखांचे मताधिक्‍य देणारे मोहिते- पाटील जाइंट किलर ठरले आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीपुर्वी उदयनराजेंच्या विरोधात राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये नाराजीचा सूर उमटत होता. नाराजी दूर करण्यासाठी शरद पवार यांनी सर्व आमदारांची संयुक्त बैठक घेतली. त्यावेळी पवारांनी आमदारांच्या नाराजीचे कारण ऐकून घेतले. उदयनराजे पक्षविरोधी भूमिका घेत आहेत. त्याचबरोबर खासदारकीचा फंड विरोधकांना वितरित करत असल्याची आमदारांची तक्रार होती.
तसेच सातारा नगरपालिका निवडणूक पराभवापासून आ. शिवेंद्रराजेंनी संघर्षाची भूमिका घेतली होती. अशी परिस्थिती असताना देखील पवारांनी उदयनराजेंना उमेदवारी देण्याचे निश्‍चित केले होते. त्यामुळे बैठकीत आमदारांचे मन वळविण्याचे प्रयत्न केले तसेच लोकसभा निवडणूकीत उदयनराजेंना निवडून आणण्याचा शब्ददेखील आमदारांकडून घेतला. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट असताना उदयनराजे सव्वा लाखांच्या मताधिक्‍क्‍याने निवडून आले.

उदयनराजेंना पाटण व कराड दक्षिण विधानसभा मतदारंसघात मताधिक्‍य मिळाले नाही. मात्र, राष्ट्रवादीच्या चारही विधानसभा मतदारसंघात मताधिक्‍य मिळाले आहे. त्यावरून आमदारांनी पवारांना दिलेला शब्द खरा करून दाखविला आहे. माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने इतिहास घडविला आहे. इतिहास घडविताना माजी मंत्री व विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते- पाटील व रणजितसिंह मोहिते- पाटील जायंट किलर ठरले आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांनी करमाळा, माढा व सांगोल्यात तर भाजपचे विजयी उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माळशिरस, फलटण व माण विधानसभा मतदारसंघातून मताधिक्‍क्‍य घेतले. निंबाळकर 86 हजार मतांनी निवडून आले. मात्र, त्यामध्ये मोहिते- पाटील यांनी माळशिरस विधानसभा मतदारसंघातून निंबाळकर यांना तब्बल 1 लाखांचे दिलेले मताधिक्‍य निर्णायक ठरले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.