पुसेगाव – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात काही कारणांमुळे राष्ट्रवादीला अपयश आले असले तरी आ. शशिकांत शिंदे यांचे जोमाने काम सुरू आहे. कोरेगावात पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आमदार निवडून येईल, असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या माजी प्रदेशाध्यक्षा, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस रमेश उबाळे यांच्या बालाजी कन्स्ट्रक्शनच्यातिरुपती निवास येथे रुपाली चाकणकर यांनी भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या. रूूपाली चाकणकर म्हणाल्या, “”कोरेगाव विधानसभा मतदारसंघ शरद पवार यांचा विचार मानणारा मतदारसंघ असून या ठिकाणी आ. शशिकांत शिंदे यांना अपघाताने पराभवाला समोरे जावे लागले तरीही आ. शिंदे हे मतदारसंघात जोमाने काम करत आहेत.
या ठिकाणी पुन्हा राष्ट्रवादीचाच आमदार निवडून येईल.” राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचून अडीअडचणी जाणून घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावले पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले. मागासवर्गीय समाजातील शेवटच्या घटकापर्यंत समाजकल्याण विभागातील योजना पोहेचवणे, आरोग्य किंवा शैक्षणिक विषयी कामे करणे, गाव तिथं सामाजिक न्याय विभागाची शाखा काढणे, वरिष्ठ पातळीवरील लोक आपल्यासोबत आपल्याला हवी तेवढी मदत करतील.
आपलं काम बोललं पाहिजे म्हणजे लोक नेतृत्व स्वीकारतील, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी बालाजी कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याचेही रुपाली चाकणकर यांनी कौतुक केले. यावेळी रमेश उबाळे म्हणाले, महाराष्ट्रभर पक्ष संघटनेसाठी व महिलांचे प्रश्न सोडवणाऱ्या नेत्या चाकणकर यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभले. तिरुपती निवासला भेट दिल्याबद्दल त्यांचे उबाळे यांनी आभार मानले.