अहमदनगर – गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. तसंच मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचंही आवाहन करण्यात येत आहे. राज्य सरकारकडून यासंदर्भात एक कॅम्पेन सुरू करण्यात आलं आहे. याद्वारे कायम हात स्वच्छ करत राहणं, सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क परिधान करणं आवश्यक असल्याचा संदेश देण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून ‘मी जबाबदार… माझा मास्क, माझी जबाबदारी’ अशा मथळ्याखाली एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यातून त्यांनी नागरिकांना करोनासंदर्भात खबरदारी घेण्याचे आवाहन केले. मात्र, ठाकरे सरकारमधीलच राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांना जबाबदारीचा विसर पडल्याचे दिसते.
आमदार लंके यांनी रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या रुग्णांची कोणत्याही सुरक्षेविना भेट घेतली. त्यांच्यासोबत सेल्फीही घेतले. ‘मी असुरक्षित असलो तरी चालेल माझी जनता मात्र सुरक्षित असली पाहिजे’ असे सांगत लंके यांनी ही भेट घेतली असली तरी प्रत्यक्षात मात्र त्यांनी त्यांच्यासह इतरांचाही जीव धोक्यात घातल्याचे दिसते.
पारनेर तालुक्यातील सुपे येथील एका खासगी करोना रुग्णालयास आमदार लंके यांनी भेट दिली. यावेळी लंके यांनी करोनाची लक्षणे असलेल्या तसेच श्वसनाचा अधिक त्रास होत असलेल्या रुग्णांची त्यांच्या खाटाजवळ जाऊन भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधला. काही ठिकाणी रुग्णांनी त्यांच्यासोबत सेल्फी घेतला तर काही ठिकाणी लंके यांनी स्वत: रुग्णांसोबत सेल्फि घेतला. लंके यांच्या भेटीमुळे रुग्ण सुखावले. मात्र, करोनाबाबतची योग्य ती खबरदारी न घेता, मास्क परिधान न करता रुग्णांसोबत सेल्फी घेतल्याने लंके सोशल मीडियावर टीकेचे धनी बनले आहेत.
आमदार लंके यांनी पारनेर भागातील नागरिकांसाठी करोनाबाबतच्या योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. करोना रुग्णांना दिलासा देण्यासाठी लंके यांनी पुढाकार घेऊन विविध उपक्रम राबविले. मोठे कोविड सेंटरही सुरू केले. मात्र रुग्णांप्रती काळजी असल्याचे दाखविताना त्यांनी आपल्याच सरकारने घालून दिलेल्या नियमांचा भंग केल्याचे दिसते.