पुणे : झारखंड विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून राज्यामध्ये काँग्रेस-जेएमएम-राजद यांच्या आघाडीने सत्ताधारी भाजपचा सपशेल पराभव केला आहे. झारखंडमध्ये काँग्रेस-जेएमएम-राजद यांच्या आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले असून येत्या २९ डिसेंबर रोजी विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते व शिबू सोरेन यांचे पुत्र हेमंत सोरेन हे मुख्यमंत्रीपदावर विराजमान होणार असल्याचे नक्की मानले जात आहे.
झारखंड येथील विधानसभा निवडणुका या राष्ट्रवादी काँग्रेससाठी देखील खुशखबर देणाऱ्या ठरल्या असून झारखंड येथील हुसैनबाद मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार कमलेश कुमार सिंह यांचा विजय झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाची टिकटिक झारखंडमध्ये देखील सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज आमदार कमलेश कुमार सिंह यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पुणे येथे भेट घेतली आहे. या बाबत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ट्विटरद्वारे माहिती देताना पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी झारखंड येथील नवनिर्वाचित आमदार कमलेश कुमार सिंह यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्याचे सांगण्यात आले आहे.
झारखंड विधानसभा निवडणुकीत हुसैनाबाद मतदारसंघातून विजय मिळविणारे @NCPspeaks चे नवनिर्वाचित आमदार कमलेश कुमार सिंह यांनी आज आदरणीय खा. @PawarSpeaks साहेबांची पुण्यात सदिच्छा भेट घेतली. पवार साहेबांनी पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.@MumbaiNCP@supriya_sule #Jharkhand pic.twitter.com/euKCs6xnNW
— NCP (@NCPspeaks) December 25, 2019