भाजपविरोधात राष्ट्रवादीची “मोर्चा’ बांधणी 

पिंपरी – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजपची कोंडी करण्याची रणनिती राष्ट्रवादी कॉंग्रेसने आखली आहे. शास्तीकर, रिंगरोड, रेडझोन या शहरातील प्रमुख प्रश्‍नांविरोधात उद्या (शुक्रवारी) मोर्चा काढून राष्ट्रवादी भाजप विरोधात पहिला शड्डू ठोकणार आहे. मोर्चासाठी गर्दी जमवून शक्‍तीप्रदर्शनाची जोरदार तयारी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सुरू आहे. राष्ट्रवादीकडून गेल्या अडीच वर्षांत पहिला धडक मोर्चा काढण्यात येत असल्याने या मोर्चाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व अनधिकृत बांधकामांवरील सरसरकट शास्तीकर माफ करावा, या प्रमुख मागणीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका भवनावर गुरूवारी (दि.25) मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याची सुरूवात सकाळी दहाला आकुर्डीतील खंडोबा माळ मंदिर चौकातून होणार आहे. या मोर्चात नागरिकांसह विविध पक्षाचे नगरसेवक व पदाधिकारी तसेच, विविध संस्था व संघटनांचे पदाधिकारी सहभागी होणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील अनधिकृत बांधकामांना भरमसाट शास्तीकर लावला आहे. सदर शास्तीकर सरसकट माफीचे आश्‍वासन मागील विधानसभा व महापालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपने दिले होते. मात्र, ते आश्‍वासन अद्याप पूर्ण केले गेले नाही. एक हजार फुटापेक्षा अधिक आकारांच्या निवासी आणि सर्व बिगरनिवासी अनधिकृत बांधकामांना शास्तीकर अद्याप कायम आहे. थकीत शास्तीकर भरण्यासाठी पालिका जप्तीचा नोटीसा देत आहे. त्यामुळे नागरिक दहशतीच्या सावटाखाली वावरत आहेत, त्यामुळे या मोर्चाचे आयोजन केले आहे.

सत्ताधारी भाजपने दिलेल्या आश्‍वासनाची आठवण करून देण्यासाठी गुरूवारी पालिकेवर मोर्चा काढला जाणार आहे. सरसरकट शास्ती माफी जाहीर करावी. शास्तीचा झिजिया करा रद्द करावा, पालिका, प्राधिकरण व एमआयडीसी, रेडझोन, म्हाडा यांच्या जागेवरील अनधिकृत घरे नियमित करावीत, कालबाह्य रिंगरोड रद्द करावा, आदी मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून केल्या जाणार आहेत. या मोर्चात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक मोरेश्‍वर भोंडवे यांनी केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)